मुंबई : राष्ट्रवादीच्या एका गटाने बंड केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार यांना पूर्व कल्पना न देता, त्यांची कोणतीही अपॉइंटमेंट न घेता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल तासभर ही भेट झाली. या नेत्यांनी शरद पवार यांना काही विनंती केली. पण शरद पवार यांनी त्यावर काहीच भाष्य केलं नाही. यावेळी सर्वच मंत्र्यांनी शरद पवार यांच्या पाया पडून दर्शन घेतले. आम्ही चुकलो असं सांगत माफीही मागितल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवारांसह त्यांच्या गटाने अचानक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. आणि दिलगिरी व्यक्त केली. देवगिरीवरील बैठकीनंतर अजित पवार गटाचे नेते अचानक वाय. बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांच्या भेटीला आले. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. त्यानंतर या नेत्यांनी मीडियाशी संवाद साधला. भेटीची माहिती दिली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही या भेटीची माहिती दिली. राष्ट्रवादीतून फुटून सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेलेला एक गट शरद पवार यांच्या भेटीला आला होता. त्यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. माफी मागितली. मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हे सर्व नेते अचानक भेटायला आले होते. नंतर मला बोलावलं, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

दरम्यान, आपल्याला पुरोगामी विचार घेऊन पुढे जायचंय, असं वक्तव्य शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या युवकांना मार्गदर्शन करताना केलंय. त्याचसोबत, पवारांच्या भूमिकेत कसलाही संभ्रम नाही, शरद पवारांच्या भूमिकेत बदल नसून, ते विरोधी पक्षांच्या बैठकीला जाणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. त्यामुळे, अजित पवार गटाचे मनोमीलनाचे प्रयत्न तूर्तास तरी निष्फळ ठरल्याचं बोललं जातंय.

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबतही त्यांनी भाष्य केलं. आमची काँग्रेसशी चर्चा झाली आहे. ठाकरे गटाशीही चर्चा झाली आहे. आमच्याकडे संख्याबळ अधिक नसताना विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणं योग्य नाही. कागदावर आमचाच पक्ष मोठा आहे. कारण सोडून गेलेल्यांनी पक्ष सोडल्याचं म्हटलेलं नाही. पण तरीही विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही दावा करणार नाही. आमच्याकडे सध्या 19 ते 20 आमदार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

कोण काय म्हणाले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला याची कल्पना नाही. पण वर्षोनुवर्षे पवारसाहेब त्यांचे नेते राहिलेले आहेत, त्यामुळे भेट घेतली तर त्यात वावंग काही वाटत नाही.

उदय सामंत म्हणाले त्यांनी भेट का घेतली हे त्यांनाचं विचारावं लागेल त्यांनीच जाहीर करावं लागेल, पण त्यांचा वैयक्तीक पक्षाच विषय असू शकेल.

शंभुराज देसाई म्हणाले, सगळेच मंत्रीमहोदय म्हणतात राष्ट्रवादी सोडली नाही आणि पवारसाहेब हेच आमचे नेते आहेत त्यामुळे औपचारीक भेट घेण्यासाठी गेले असतील त्यात वेगळं काही वाटत नाही.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जेवढा संभ्रम निर्माण करता येईल तेवढा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आजची शरद पवारांची भेट एक खेळीचा भाग वाटतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!