मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार १७ जुलैपासून म्हणजेच (उद्यापासून) सुरू होत आहे. भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून, विरोधी पक्ष कमजोर केला आहे. त्यामुळे विरोधकांना आपले अस्तित्व दाखवून द्यावे लागणार आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधा-यांना घेरण्याची रणनिती विरोधकांकडून आखली जाते. त्यामुळे सत्ताधारीही चिंतेत असतात. पण अधिवेशनाच्या तोंडावरच राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड करीत सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले असून, विरोधी पक्ष खिळखिळी करण्याचा भाजपचा डाव यशस्वी झाला आहे. सध्या विधिमंडळात सत्ताधा-यांकडे २०० च्या आसपास आमदार आहेत. तर शिवसेनेचे ३० राष्ट्रवादीचे १० ते १५ आणि काँग्रेसचे ४४ आमदार असे संख्याबळ आहे. त्यामुळे सत्ताधारी रिलॅक्स असून विरोधकांना अस्तित्व दाखवून देण्याचे मोठं आव्हान आहे. विरोधी बाकांवर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे बाळासाहेब थोरात नाना पटोले अशोक चव्हाण भास्कर जाधव तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे अनिल परब यांनाच किल्ला लढवावा लागणार आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चहापानासाठी सह्याद्री अतिथीगृहावर आमंत्रित केले आहे. तत्पुर्वी महाविकास आघाडीच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अधिवेशनासाठी विरोधकांची रणनीती ठरणार आहे. सरकारला घेरण्याची संधी आम्ही सोडणार असे नाना पटोले आणि आंबादास दानवे यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला जाऊ शकतो अशी शक्यता आहे.
आज बैठकांचे सत्र
महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर विधिमंडळातील विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत विरोधक सरकारला घेरण्याची रणनीती ठरवणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. तसेच अजित पवार गटाच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात ही बैठक होणार असून सुनिल तटकरे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आमदारांना व्हीप बजावला जाणार आहे. प्रतोद अनिल पाटील यांनी ही माहिती दिली आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्हीप बजावण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी व्हीप नाकारला तर त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशी मागणी अनिल पाटील यांनी दिली आहे
पावसाळी अधिवेशनात हे मुद्दे गाजणार
१ विरोधी पक्षातील झालेली फूट
२ राज्यातील धार्मिक, जातीय तणावाच्या घटना
३ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमधील वाढ
४ नागपूर मुंबई समृध्दी महामार्गावरील अपघातांच्या घटना
५ पाऊस लांबल्याने शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट तसेच बोगस बी बियाणे समस्या
६ कृषी विभागाच्या धाडी प्रकरणात मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर झालेले आरोप
७ मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप