ओतूर : सातत्यपूर्ण मेहनत आणि अभ्यासपूर्ण नियोजन असेल, तर शेतकरी कोट्यधीश होऊ शकतो. जुन्नर तालुक्यातील पाचघर येथील शेतकरी ईश्वर गायकर आणि पत्नी सोनाली गायकर यांनी अलीकडे टोमॅटो पिकातून जे यश मिळवलं आहे ते हेच अधोरेखित करते. टोमॅटोने या शेतकरी दाम्पत्याला १२ एकर टॉमेटो लागवडीतून दोन महिन्यात तब्बल दोन कोटी तीस लाख रुपये आत्तापर्यंत उत्पन्न मिळवले आहे.
ईश्वर गायकर आणि त्यांची पत्नी सोनाली गायकर या दाम्पत्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. शेतीसाठी आवश्यक सर्व कच्चा माल आणि हवी ती साधनसामग्री पुरवण्याची जबाबदारी ईश्वर यांनी घेतली, तर बारावी सायन्स पूर्ण केलेल्या सोनालीने शेती मशागतीसाठी लागणारे मनुष्यबळ, हवामानाचा आणि इतर गोष्टींचे नियोजन यांची जबाबदारी सांभाळत गेली. कित्येक वर्षे हे शेतकरी दाम्पत्य टोमॅटोचे पीक घेत आहे. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ संजय नवले आणि गोपीनाथ दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एप्रिल महिन्यात बारा एकर क्षेत्रामध्ये ६२४२ सिजेंटा या ६०,००० टोमॅटो रोपांची लागवड केली. आणि योग्य नियोजन करून टोमॅटोचा भाग बहरात आणली. ज्यावेळी टोमॅटोला फळधारणा चालू झाली आणि नशिबाने साथ दिली टोमॅटो पिकाचे भाव गगनाला भिडले गायकर यांची टोमॅटो मार्केटमध्ये दाखल झाली. आणि बघता बघता ते टोमॅटो उत्पादनातून करोडपती झाले. गेल्या तीन वर्षात एकदाच, म्हणजे दोन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये लहरी हवामानामुळे त्यांचे नियोजन वाया गेले होते. १६ ते १७ लाख रुपये भांडवल घालून ते अंगावर आले तर २०२२ ला टॉमॅटो पिकाने जवळपास २० लाख रुपये मिळवून दिले. तर यंदा २०२३ ला १३,१४,१५ एप्रिलला १२ एकर क्षेत्रात शेताची चांगली मशागत करून बेड पाडून मल्चिंग पेपरवर ६० हजार टोमॅटो रोप लागवड केली. योग्य तो पाणी मात्रा, खते औषधे, फवारणी, मांडव करणे, टोमॅटो बाधणी, मजुरी असे एकूण ४० लाख रुपये भांडवल गेले. तर आता पर्यंत १५ टोमॅटो तोडे झाले असून १५ हजार कॅरेट गेले असून आता पर्यंत २ कोटी ३० लाख रुपये झाले आहेत. अजून पुढे ६ ते ७ हजार कॅरेट जातील असा अंदाज आहे. तर १ दिवसाला १८०० कॅरेट गेली असून सर्वात जास्त बाजार २३११ रूपये कॅरेटला बाजार नारायणगाव उपबाजार येथे मिळाला असून तर सर्वात कमी बाजार ६६० रूपये मिळाला आहे. तरी एवढे उत्पन्न व बाजार मिळाला आम्ही समाधानी आहोत. तसेच आमचे वडील तुकाराम गायकर यांचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभले चांगली शेती पिकवण्यामागे अनमोल मार्गदर्शन लाभत आहे असे ईश्वर गायकर व सोनाली गायकर यांनी सांगितले.