मुंबई – वडाळा येथील सिध्दार्थ विहार हॉस्टेल नव्याने उभारण्यासाठी शासनाकडून ७८ कोटीचा निधी मंजूर केला मात्र भूमिपुजन सोहळयाच्या कार्यक्रमात डावलल्याने केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले नाराज झाले आहेत. पालकमंत्री दीपक केसरकर यांची दिशाभूल करून पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या बॅनरखाली चुकीच्या पद्धतीने सिद्धार्थ विहार हॉस्टेलचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे सुमंत भांगे, दिनेश डिंगळे हे अधिकारी जबाबदार असुन त्यांच्या विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण तक्रार करणार असल्याची माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बांद्रा पूर्व येथील कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले की, सिद्धार्थ विहार हॉस्टेलला आंबेडकरी चळवळीत ऐतिहासिक महत्व राहिले आहे. मी स्वतः महाविद्यालयीन विद्यार्थीं असताना सिद्धार्थ विहार होस्टेल ला राहिलो आहे. भारतीय दलित पँथर च्या केंद्रस्थानी सिद्धार्थ हॉस्टेल राहिले आहे. ते जीर्ण झाल्यानंतर त्याची नव्याने उभारणी करण्यासाठी माझ्या प्रयत्नाने शासनाकडुन ७८ कोटींचा निधी मंजूर केला. त्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या सिद्धार्थ विहार हॉस्टेल चा भूमिपूजन सोहळा भव्य आणि सर्वांना विश्वासात घेऊन करणे अपेक्षित होते.
दि.८ जुलै हा पीपल्स एज्युकेशन सोसायटी चा वर्धापन दिन आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आहे. या सोसायटी मध्ये वाद आहेत. मात्र धर्मदाय आयुक्तांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अधिकृत चेयरमन म्हणून मला मान्यता देणारा निर्णय दोन वेळा दिला आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी चा अधिकृत चेयरमन मी असून पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या बॅनर खाली सिद्धार्थ विहार हॉस्टेल च्या भूमीपूजनात चुकीची माहिती देऊन पालकमंत्री दीपक केसरकर यांना बोलविण्यात आले.या भूमीपूजनात मला डावलण्यात आले.पीपल्स एज्युकेशन सोसिटीशी कोणताही संबंध नसणाऱ्या आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत पीपल्स एज्युकेशन सोसायटी चा अनधिकृत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असा आरोप आठवले यांनी केला.
मी शिवसेना भाजप आरपीआय महायुती चा घटक पक्ष आहे.असे असताना पालकमंत्री केसरकर यांनी योग्य माहिती घेऊन या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत निर्णय घ्यायचा होता. यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी दिनेश डिंगळे आणि अन्य अधिकाऱ्यांनी चूक केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. आनंदाज आंबेडकर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत त्याबाबत आम्हाला त्यांचा आदर आहे. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीशी त्यांचा काही संबंध नाही. पीपल्स एज्युकेशन सोसायटी चा अधिकृत चेयरमन मी असल्याची माहिती रामदास आठवले यांनी आज देऊन सिद्धार्थ विहार हॉस्टेल भूमीपूजनात त्यांना डावलल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.