मंदिरावर कारवाई, अनधिकृत बांधकामांना अभय ?

केडीएमसीचा अनोखा कारभार :  डोंबिवलीत बेकायदा बांधकामे जोरात

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेकडून रस्त्याला अडथळा ठरणा- या अनधिकृत  मंदिरावर जोरदार कारवाई सुरू आहे. मात्र शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असतानाही त्याकडे मात्र महापालिकेने कानाडोळा केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंदिरावर जशी कारवाई करण्यासाठी तत्परता दाखवली जाते तशीच अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी पालिका आयुक्त पी वेलारासु तत्परता दाखवतील का ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून डोंबिवली शहरातील अनेक मंदिरांवर पालिकेकडून कारवाई सुरू आहे. मागील आठवड्यात एकाच दिवशी तीन मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली. डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग क्षेत्रात बेकायदा बांधकामांच्या मजलेच्या मजले उभे राहत आहेत. गायकवाडवाडी, नवापाडा, आदी परिसरात बेकायदा बांधकामे जोरदारपणे सुरू आहेत.  मात्र या बेकायदा बांधकामांकडे पालिका प्रशासनाकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.  अनधिकृत बांधकामे दिवस- रात्र सुरू असून, सहा महिन्यात इमारत उभी केली जाते.  त्यामुळे इमारतीच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. झटाझट इमारती उभ्या केल्या जात असल्याने  निकृष्ट दर्जाचे बांधकाम  होत आहे त्यामुळे येथे राहणा-या रहिवाशांच्या  जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकृत बांधकामांपेक्षा सरस पध्दतीने  अनधिकृत बांधकांमाच्या इमारती बांधल्या जात आहेत. गायकवाडवाडीत एकमेकाला खेटून पाच मजल्याची इमारती बांधण्यात आली आहे. त्यामुहे बिनदिक्तपणे पाच पाच मजल्याच्या इमारती उभ्या केल्या जात आहेत त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.  एखादा प्रसंग घडल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी त्या ठिकाणी पोहचू शकत नाही अशी अवस्था आहे. मात्र या सगळ्याकडे स्थानिक नगरसेवक आणि ह प्रभाग अधिकारी यांनीही दुर्लक्ष केले आहे. स्थानिक नगरसेवक आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्या आशीर्वादामुळेच शहरातील कुठल्याच अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मंदिरांवर कारवाई करण्यासाठी सरसावलेले महापालिकेचे अधिकारी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे धारिष्ट दाखवतील का ? असा सवाल डोंबिवलीकरांमध्ये व्यक्त होत आहे.
———

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *