यंत्रातून होते 8 तासात 4 एकर जमीनीवर पेरणी

नागपूर, 17 जून  : शेतीच्या कामासाठी मजूरांचा अभाव ही ग्रामीण भागातील मोठी समस्या बनली आहे. परंतु, आता या समस्येवर नागपुरातील अभियंत्याने उपाय शोधून काढला आहे. त्याने इंधनाविना चालणारे अनोखे पेरणी यंत्र बनवले आहे. या यंत्राद्वारे 8 तासात 4 एकर जमिनीवर पेरणी करणे शक्य झालेय.

नागपूर जिल्ह्यातील मेकॅनिकल इंजिनिअर असलेले ओमप्रकाश कैलास देशमुख यांनी हे पेरणी यंत्र बनवले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना हे यंत्र खूपच फायद्याचे असल्याचे ठरू शकते.ग्रामीण भागात बैलाचे भाडे 1500 रूपये आणि बैल चालवणाऱ्याला 500 रूपये असा दिवसाला किमान 2हजार रूपये खर्च येतो. इतका खर्च करूनही शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत. त्यामुळे पेरणीच्या हंगामात अल्पभूधाक शेतकऱ्यांची चांगलीच गैरसोय होते. परंतु, अभियंता ओमप्रकाश देशमुख यांचे पेरणी यंत्र अशा शेतकऱ्यांसाठी खूप सोईचे ठरू शकते. या यंत्राद्वारे एकूण 30 प्रकारचे बियाणे पेरता येते. यात एकावेळी 3 किलो बियाणे मावेल अशी टाकी दिलेली आहे. प्रत्येक बियाण्याच्या आकारमानानुसार वेगवेगळ्या चकत्या दिलेल्या आहेत. पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सतत वाकावे लागल्यामुळे पाठदुखी सारखे आजार होतात. या यंत्राने पेरणी करण्यासाठी ताठ चालावे लागते. शिवाय आराम करून पेरणी केली तरी एका दिवसात किमान साडेतीन एकरात पेरणी होते.

सरकी पेरण्याची मशीन 7 हजार रुपयांची आहे. यात एकाचवेळी बियाणे आणि खत पेरणी करण्याची 2 टाकीचे पेरणी यंत्रही येते. त्याची किंमत 10 हजार रूपये आहे. वापरायला सुलभ असलेल्या या यंत्राद्वारे पट्टा पद्धतीने पेरणी होते. त्याशिवाय हे यंत्र मशागतीला सुलभ आहे. या मॅन्युअल सीड ड्रिल मशिनला 12 दाते आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायद्याचे असल्याचे देशमुख म्हणाले. एका दिवसात साधारणत: पेरणीसाठी 7 महिलांची गरज भासते. या महिलांना प्रतिव्यक्ती 200 रूपये दराने मजुरी दिल्यास साडेतीन एकरसाठी एका दिवसाचे 1400 रूपये खर्च होतात. एकूण खर्च सुमारे 7 ते 8 हजार येतो. याउलट पेरणी यंत्र 7 हजार रुपयात मिळते. वर्षभरात खर्च निघतो. तसेच आपले काम झाल्यावर इतर शेतकऱ्यांनाहे यंत्र भाड्याने देऊन उत्पन्न देखील मिळवता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *