आंबिवली स्थानकातील पादचारी पुलाची दुरुस्ती सुरु

रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांच्या मदतीसाठी जीआरपी जवानांची नियुक्ती करण्याची गरज

कल्याण (प्रविण आंब्रे): एल्फिस्टन येथील दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने धोकदायक पुलांच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे. त्यानुसार आंबिवली रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पूल लष्करामार्फत बांधण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. असे असले तरी सध्या स्थानकात अस्तित्वात असलेल्या पादचारी पुलाची स्थिती देखील खराब झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.  मात्र रेल्वे प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाताना रेल्वे मार्ग ओलांडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. येथील संभाव्य अपघाताची शक्यता पाहता प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच आबालवृद्धांना मदत करण्यासाठी जीआरपीच्या जवानांची नियुक्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

आंबिवली स्थानकात फलाट एक आणि दोन यांना जोडणारा एकमेव पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दि. ८ ते २३ नोव्हेंबर असे १५ दिवस हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानकातून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना रेल्वे मार्ग ओलांडून दुसऱ्या फलाटावर जावे लागणार आहे. हा रेल्वेचा पादचारी पूल असला तरी आंबिवली पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा महत्वाचा दुवा आहे. त्याशिवाय रेल्वेने मनाई केली असतानाही परिसरातील नागरिक आणि रेल्वे प्रवाशी रेल्वे मार्ग ओलांडनेच अधिक पसंत करतात. अपघात होऊ नये यासाठी रेल्वे मार्ग ओलांडत जीव धोक्यात न घालता पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले जात असताना आंबिवली स्थानकात बरेच प्रवाशी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. तसेच येथून जवळच असलेल्या बल्याणी व आसपासच्या परिसरात झालेल्या बेसुमार चाळीं उभ्या राहिल्या असून तेथील लोकवस्ती गेल्या ४-५ वर्षात प्रचंड वाढली आहे.

ठाणे-मुबई-कल्याण येथून कामावरून रात्री लोकलने परतणाऱ्या येथील नागरिकांमध्ये स्थानिक प्रवासाचे एकमेव साधन असलेली रिक्षा पकडण्यासाठी फलाट एकवरून दोनवर जाण्यासाठी रेल्वे मार्गात उड्या मारून जावे लागते. अस्तित्वातील पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने शिस्तबद्धपणे पादचारी पुलाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना आता नाईलाजाने रेल्वे मार्ग ओलांडण्याची वेळ आली आहे. या प्रवाशांमध्ये वृद्ध विद्यार्थी-लहान मुले यांची संख्या लक्षणीय आहे. रेल्वेच्या वळण मार्गावर हे स्थानक असल्याने येथे अपघाताची शक्यता अधिक असल्याचे काही सुजाण रेल्वे प्रवाशांचे मत आहे. येथून ये-जा करणाऱ्या लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांबाबत रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना सावधान करण्यासाठी वेळोवेळी उद्घोषणा करण्याची आवश्यकता आहे, तसेच वृद्ध, विद्यार्थी-लहान मुले यांना सक्रियपणे मार्गदर्शन करण्यासाठी मार्गाच्या दोन्ही बाजूला सुरक्षित ठिकाणी जीआरपीच्या जवानांची नियुक्ती करण्याची आत्यंतिक आवश्यकता येथील सामाजिक कार्यकर्ते सुशील आरके यांनी व्यक्त केली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या नियोजनात कमतरता राहिल्याने या बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *