जीवघेण्या सापळ्यातून अखेर ‘त्या’ माकडाच्या पिल्लाची सुटका
माकड – कुत्र्याच्या मैत्रीचेही घडले दर्शन
कल्याण : वाट चुकलेल् माकडाचे पिल्लु कल्याणला आलं. ते पण रेल्वेच्या उच्च दाबाच्या वहिनी असलेल्या ठिकाणीच विसावले. जीवघेण्या वायरचा शॉकही त्याला अनेकवेळा लागला, पण त्याचे नशीब बलवत्तर म्हणून ते थोड्यावरच झालं. तिथल्या कुत्र्याशी त्या माकडाच्या पिल्लाची मैत्री झाली. त्यामुळे ते माकड तेथून हलायला तयार नव्हते. आणि कुत्रा त्या पिल्लाशिवाय राहत नव्हता. माकडाच्या पिल्लाच्या जीवाचा घोर तेथील कर्मचाऱ्यांना लागला होता. अखेर आज त्या जीवघेण्या सापळ्यातून त्या पिल्लाची सुटका करण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलं. आणि सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. शॉक लागून ते पिल्लू जखमी झालेय. त्याामळे त्याच्यावर उपचार केल्यानंतर जंगलात सोडण्यात येणार आहे. तोपर्यंत ते पिल्लू वन विभागाच्या ताब्यात राहणार आहे.
19 ऑक्टोबरला हे माकडाचे पिल्लू विद्युत विभागात आले होते. याठिकाणी विजेचा शॉक लागून ते जखमी झाले होते. यामुळे वीज खंडीत होऊन माकडाचा जीव जाण्याचा धोका होता त्यामुळे ठाकुर्ली सब स्टेशनचे अधिकारी तुषार रानडे यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार केली. तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाचे अधिकारी त्या पिल्लाला पकडण्यासाठी आले. मात्र त्या माकडाची तिथल्या एक कुत्र्याबरोबर मैत्री झाल्याने कुत्रा त्या माकडाला हात लावून देत नव्हता. कुत्र्याच्या अडथळ्यांमुळे दोन वेळा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हात हलवत माघारी परतावे लागले होते. अखेर आज वन विभागाचे पथक तयारीनिशी आले त्यांनी पहिल्यांदा त्या कुत्र्याला पकडून बंद करून ठेवले. त्यानंतर त्या माकडाच्या पिल्लाला पकडून सुटका करण्यात यश मिळवलं. कल्याणचे वनपाल मुरलीधर जागकर, वन्य जीव अभ्यासक सुहास पवार, सर्पमित्र दत्ता बोंबे, हितेश करंजगावकर, अथर्व यारोपनेर , निखिल कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
——-