मुंबई, दि. ५ जून : कुस्ती फेडरशेनचे अध्यक्ष व भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे दाखल करण्यात आले असताना मोदी सरकार मात्र बृजभूषण शरण यांना पाठीशी घालत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कवच या महिला कुस्तीपटुंसाठी नसून स्वतःच्या पक्षाच्या गुन्हेगार खासदार बृजभूषणला वाचवण्यासाठी आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर कुस्तीपटूंना न्याय मिळून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिषा बागुल, प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा चारुलता टोकस, युवक काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार, प्रदेश सरचिटणीस उत्कर्षा रूपवते, नीता त्रिवेदी, नवी मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुदर्शन कौशिक, उज्वला साळवे, रूपाली कापसे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पूनम पाटील, जान्हवी देशमुख, वैशाली भोसले, निर्मला म्हात्रे, कांचन कुलकर्णी, प्रविणा चौधरी, श्रद्धा ठाकूर, रूपा पिंटू, रुकसाना जी. रेहणाजी यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, बृजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत, ते स्वतःच एकाचा खून केल्याची कबुली देत आहेत. तर देशाचे नाव जगात उज्ज्वल करणाऱ्या महिला कुस्तीपटूंवरच त्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा या महिला खेळाडू सांगत आहेत. अल्पवयीन खेळाडूवरही लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल असूनही राजकीय दबावामुळे खासदार बृजभूषण यांच्यावर मोदी सरकार कारवाई करत नाही, हे दुर्दैवी आहे.
यावेळी बोलताना महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे म्हणाल्या की, महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या खासदाराला भाजपा वाचवत आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करतो. बेटी बचाव, बेटी पढाव चा नारा देणाऱ्या भाजपापासूनच बेटी बचाव म्हणावे लागत आहे. हे या देशाचे दुर्भाग्य आहे. देशाचे पंतप्रधान या महिला खेळाडूंवरील अत्याचारावर एक शब्दही बोलले नाहीत यातूनच त्यांचा महिलांबाबतचा दृष्टीकोन दिसून यतो.