मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळाची साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटक यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी येताच मराठी सिनेसृष्टी हळहळली. त्यांना प्रेमाने आणि आदराने ‘सुलोचना दीदी’ असं म्हणायचे. तब्येत बिघडल्याने सुलोचना दीदी यांना आज मुंबईतील सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुलोचना दीदीं यांचा जन्म २० जुलै १९२८ रोजी झाला. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचे लग्न झालं. सुलोचना यांना कांचन नावाची मुलगी आहे. कांचनने प्रसिद्ध मराठी अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्याशी लग्न केलं. सुलोचना यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २००४ मध्ये फिल्मटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. सुलोचना दीदींनी जवळपास सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत २५० हिंदी आणि ५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. १९३२ मध्ये माधुरी या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. एक दशकाहून अधिक काळ मुख्य अभिनेत्रीची भूमिका केल्यानंतर, त्यांनी त्या काळातील सुनीत दत्त आणि देव आनंद यांसारख्या सुपरस्टार्सच्या आईची भूमिका साकारली.

सुलोचना दीदी यांनी बाॅलिवूड चित्रपटांसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मराठा तितुका मेळावा, मोलकरीण, बाळा जो र, सांगते ऐका, सासुरवास अशा चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील सुलोचना दीदी यांनी काम केले आहे. आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. मेरे जीवन साथी, कटी पतंग, प्रवेश आणि त्याग यासारख्या प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका केल्या. खून भरी मांग, आशा, कटी पतंग, जॉनी मेरा नाम, आदमी, देवर, कहानी किस्मत की, अब दिल्ली दूर नहीं, दिल देके देखो, बंदिनी, नई रोशनी, आदमी, जोहर महमूद इन गोवा आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *