मुंबई : जे. जे. रूग्णालयातील अधिष्ठातांकडून  अध्यापक डॉक्टरांना त्रास दिला जात असून त्यांच्या छळाला कंटाळून त्रस्त  झालेल्या रूग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागातील प्राध्यापक व विभागप्रमुख  डॉ.रागिणी पारेख  डॉ. तात्याराव लहाने, डॉ.प्रीतम सामंत, डॉ.स्वरंजीत सिंग भट्टी, डॉ. अश्विन बाफना,  डॉ. हेमालिनी मेहता,  डॉ.शशी कपूर, डॉ. दीपक भट, डॉ. सायली लहाने या ९ अध्यापक डाॅक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे. रूग्णालयाच्या अधिष्ठातांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी अध्यापक डॉक्टरांनी केली आहे. त्यामुळे जे जे रूग्णालयात अधिष्ठाता विरूध्द अध्यापक डॉक्टर असा वाद रंगल्याचे दिसून येत आहे. 

अधिष्ठाता यांनी मागील वर्षभरात या विभागाला कोणतीही मदत केलेली नाही. वारंवार अध्यापकांना त्रास देऊन अपमान सहन करावा लागत आहे. अध्यापकांची चूक नसतानाही बदनामी केली जात आहे. डॉ लहाने हे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र कार्यक्रमाचे काम करीत आहेत. त्यांचे वेतनही अदा केलेले नाही. त्यांना शासकीय निवासस्थानासाठी सात लाख रूपये दंड लावून ते रिक्त करण्यास सांगितले आहे.  प्राध्यापक व  विभागप्रमुख तसेच सर्व अध्यापक हे मानसिक तणावातून काम करीत आहे. त्यामुळे सर्व अध्यापक डॉक्टरांनी  राजीनामा देत असल्याचे त्यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.  

*वादग्रस्त डॉक्टरांच्या नियुक्तीवर आक्षेप*

सध्या कार्यरत असलेल्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या २८ निवासी डॉक्टरांनी २२ मे २०२३ रोजी  अधिष्ठाता यांच्याकडे मार्ड संघटनेमार्फत तक्रार केली. सह अधिष्ठाता डॉ गजानन चव्हाण यांनी नेत्रविभागाकडे याचे स्पष्टीकरण मागितले. मात्र स्पष्टीकरण येण्यापूर्वीच चौकशी समिती नेमण्यात आली.  या समितीत ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असलेले डॉ अशोक आनंद यांची चौकशी समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.  डॉ अशोक आनंद यांची महिला छळप्रकरणी डॉ रागिणी पारेख यांनी यापूर्वीच चौकशी केली आहे. तसेच त्यांनी डॉ तात्याराव लहाने, डॉ रणजीत माणकेश्वर, डॉ भंडारवार, डॉ एकनाथ पवार, डॉ अभीचंदानी यांचेविरूध्द अॅट्रोसिटी अंतर्गत पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यामुळे डॉ अशोक आनंद यांच्या नियुक्तीला अध्यापक डॉक्टरांनी आक्षेप घेऊन इतर अध्यक्ष नेमण्याची मागणी केली होती, मात्र ही मागणी अधिष्ठातांकडून मान्य करण्यात आली नसल्याचे अध्यापक डॉक्टरांनी पत्रकात म्हटले आहे .

*सेवा देणारा राज्यातील एकमेव विभाग* 

१९९५ पूर्वी दररोज अवघे ३० रूग्ण येणा-या या विभागात ३०० ते ४०० रूग्ण येतात. या विभागाच्या कामाची दखल घेऊन केंद्र शासनाने २००८ मध्ये विभागास विभागीय नेत्रचिकित्सा संस्थेचा  दर्जा दिला आहे. या विभागात महाराष्ट्रातून व इतर राज्यातून रूग्ण येत असतात. डोळयामधील दुर्धर आजार किंवा शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत निर्माण झालेले रूग्ण शेवटची अपेक्षा म्हणून या विभागात उपचारासाठी येतात.  या विभागात वेगवेगळया  अतिविशोपचार सेवा दिल्या जातात.  या सेवा देणारा राज्यातील एकमेव विभाग आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी आदिवासी व ग्रामीण भागात जाऊन येथील नेत्रतज्ञ गरीब रूग्णांची सेवा करत आहेत. मागील २८ वर्षात ६९२ शिबीरे घेऊन तीस लाख रूग्णावर उपचार केले आहेत.    

 ———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!