शिर्डी : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आठवले यांनी हे अवाहन केलं आहे,

आठवले म्हणाले की, रिपाइं ज्यांच्या सोबत उभे राहतो तो पक्ष सत्तेत येतोच, मग तो काँग्रेस असो वा राष्ट्रवादी, रिपाइं फक्त सत्तेबरोबर जाणारा पक्ष नसुन, सत्ता हस्तगत करणारा पक्ष आहे. ही किमया फक्त आणि फक्त रिपाइं पक्षातच आहे. प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, उद्धव ठाकरेंकडं तुम्हाला काहीही मिळणार नाही. आपण दोघे भाजपसोबत राहू, मी तुम्हाला मोदींकडे घेऊन जातो. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी भाजपसोबत येण्याचा विचार करावा. भाजपसोबत आले तर तुमचं स्वागत करू असे आठवले म्हणाले. त्याचबरोबर ‘महाविकास आघाडी दाखवतेय वज्रमुठ आणि रोज करतेय सगळ्यांची लूट’ असा आपल्या खास शैलीत आठवले यांनी मविआचा समाचार घेतला.

नागालँड मध्ये रिपाइंचे 2 आमदार निवडुन येतात मग महाराष्ट्रात का नाही ? याचे आत्मचिंतनही कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे.
त्यामुळे कार्यकत्यांनी कामाला लागा अशा सुचनाही आठवलेंनी केल्या. रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी पुन्हा शिर्डीत येणार आहे. 2009 मध्ये मी शिर्डीतून निवडणूक लढवली होती. संधी मिळाली तर मी पुन्हा शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवेल. कारण माझा शिर्डीच्या जनतेवर विश्वास आहे. इथली जनता मला स्वीकारेल असं आठवले यांनी म्हटलं आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला शिर्डीचा सर्वांगीण विकास करायचा आहे असंही यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे.

बेशिस्त कार्यकत्यांना झापलं..

घोषणाबाजी करणा-या बेशिस्त कार्यकर्त्यांना रामदास आठवले यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. रिपब्लिकन पक्षाचा बाजार करु नका. इतर पक्षांमध्ये तुम्ही अशा पद्धतीची वर्तणूक पाहिली का? नुसते फोटो काढून, स्टेजवर गर्दी आणि घोषणाबाजी करुन पक्ष वाढणार नाही. बेशिस्तपणामुळे पार्टीचा सत्यानाश झाला असून हे थांबले नाही तर अशा लोकांना पक्षातून काढून टाकीन, अशा शब्दात आठवले यांनी कार्यकर्त्यांच्या बेशिस्तपणाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!