मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. तोपर्यंत ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत. मात्र या निर्णयामुळे विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलनही केले. मात्र विरोधकांच्या टीकेला सत्ताधा-यांकडून प्रतिउत्तर दिले जात आहे. त्यामुळे २००० च्या नोटबंदीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधानांनी शिक्षित असावे… केजरीवालांचे ट्विट
आधी म्हणाले होते, 2000 ची नोट आणल्याने भ्रष्टाचार थांबेल. आता ते म्हणतायेत की, 2000 ची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपेल, म्हणूनच आम्ही म्हणतो, पंतप्रधानांनी शिक्षित असावे. निरक्षर पंतप्रधानांना कोणीही काहीही म्हणू शकतो. त्याला समजत नाही. याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.
याला काय अर्थ .. अजित पवारांची टीका
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.मागे एकदा सरकारने सांगितलं की ५०० आणि हजाराची नोट बंद. काल फतवा काढला की दोन हजारांची नोट बंद. याला काय अर्थ राहिला आहे का? आता दोन हजारांच्या नोटा द्या आणि बदलून घ्या. आपल्या देशाने इंदिरा गांधीचा काळ पाहिला, वाजपेयींचा काळ पाहिला, मोदींच्या आधी मनमोहन सिंह पंतप्रधान होते आपण तो काळही पाहिला. काही निर्णय राज्यकर्ते म्हणून घ्यावे लागतात. नकली नोटा, बनावट नोटा, बाहेरच्या लोकांनी चलन अडचणीत आणायचा प्रयत्न केला बदल करावे लागतात याबद्दल दुमत नाही. पण हे सारखं सारखं का करावं लागतंय? याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे असं म्हणत अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
तज्ञांशी चर्चा केली असती तर हि वेळ नसती आली : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला. ‘यातून सरकारची धरसोड वृत्ती दिसून येते. आधीच तज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती.’ असं राज ठाकरे म्हणाले. दोन हजाराच्या नोटा चलनात आणल्या गेल्या तेव्हा त्या नोटा एटीएममध्ये सुद्धा जात नव्हत्या. नवीन नोटा एटीएम मशीनमध्ये जाताएत की नाही जाताएत हेही सरकारकडून पाहिलं गेलं नव्हतं. नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात, असं राज ठाकरे म्हणाले. आता दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद केल्यानंतर नागरिकांना पुन्हा बँकेमध्ये जाऊन नोटा परत कराव्या लागतील. मग आता आरबीआय पुन्हा नवीन नोटा आणणार. हे असं काय सरकार चालतं का? असं राज ठाकरे म्हणाले.
मोदींनी स्वत: वधस्तंभाकडे जायला हवे : संजय राऊत
ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दोन हजारांच्या नोटेच्या निर्णयावर मोदी सरकारवर टीका केली. गाजावाजा करुन दोन हजारांची नोट आणली होती. आता ती बंद केली असं म्हणत राऊत यांनी टीका केली. मोदी सरकारचा अर्थव्यवस्थेशी खेळखंडोबा सुरु आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आता मोदींनी वधस्तंभाकडे जायला हवे.संजय राऊत म्हणाले, नागरिकांनी पंतप्रधानांची इच्छा पूर्ण केली पाहिजे. चौकाचौकात फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे, किंवा त्यांनी स्वतःच वधस्तंभाकडे जायला पाहिजे. आपण किती लोकांचं नुकसान केलं, अर्थव्यवस्थेचं किती नुकसान केलं, महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, व्यापार, मोठे उद्योग, लहान उद्येग बंद पाडले याचा विचार करायला हवा. त्यांनी नोटबंदी करताना पहिली घोषणा काय केली होती, तर परदेशातून काळा पैसा भारतात परत येईल. एक रुपया तरी आला का? ते म्हणाले होते अतिरेक्यांना काळ्या पैशाचा पुरवठा होतो तो बंद होईल. काश्मीरमध्ये जाऊन बघा म्हणावं त्यांना.
पंतप्रधानांची हुकुमशाही मनोवृत्ती : नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. देान हजारांची नोट बंद करायची होती तर चलनात आणलीच कशाला ? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लहरी प्रमाणे राजाप्रमाणे वागत आहेत त्यांना अर्थव्यवस्थेचे काही ज्ञान आहे असे त्यांच्या निणर्यावरून वाटत नाही कसलाही अभ्यास नाही वस्तुस्थितीचे भा नाहनी परिणामांची चिंता नाही फक्त आपल्याला वाटते म्हणून काहीही निर्णय घेणे ही पंतप्रधानांची हुकुमशाहीची मनोवृत्ती आहे हे दिसून येत असे पटोले म्हणाले.
नोटीबंदीचा निर्णय हा सरकारचा नव्हे, आरबीआयचा : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘नोटाबंदी हा निर्णय आरबीआयचा असून तो काय सरकारचा किंवा पक्षाचा नाही. त्यामुळे विरोधकांनी उगाचच यावर चर्चा करू नये. नोटाबंदीसाठी आरबीआयने मुदत दिलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कुठलाही त्रास होणार नाही’. ‘विरोधकांकडे जास्तीच्या नोटा असतील म्हणून त्यांना त्रास होतो की काय असा टोला या वेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिउत्तर दिले आहे. ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल त्याला चिंता करण्याची गरज नाही ज्यांनी काळा पैसा असेल त्यांना बदलण्यात चिंता असेल असे फडणवीस म्हणाले.