डोंबिवली, १४ मे : डोंबिवली जवळील रिजन्सी अनंतम या गृह संकुलातील नागरिकांनी रविवारी बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा काढला. पाण्याच्या बादल्या घेऊन मोर्चेकरी कार्यालयसमोर ठिय्या आंदोलनही केले. गेल्या तीन महिन्यापासून येथील रहिवाश्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लावत आहे. मोर्चेकऱ्यांना आश्वासन देत बिल्डरने आठ दिवसात पाणी प्रश्न सोडवतो असे सांगितले.
पाणी उदंचन केंद्रातूनच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने पूर्वेकडील अनेक भागात पाणीच पोचत नसल्याचे प्रशासनाकडून मान्य केले जात आहे. उच्चभ्रू सोसायटी समजल्या जाणाऱ्या रिजन्सी अनंतम सोसायटीमधील रहिवाशांनी मोर्चा काढला. काही महिन्यापासून अतिशय कमी दाबाने या परिसराला पाणी पुरवठा होत असून मागच्या तीन दिवसांपासून पाणीच आलेले नसल्याने नागरिकांनी करायचे काय? असा प्रश्न मोर्चेकऱ्यांनी उपस्थित केला. या सोसायटीमधील निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा एसटीपी प्लांट देखील बंद असल्याने वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करत हे पाणी फ्लशरला मिळण्याचा मार्ग देखील बंद झाल्याने नागरिकांनी त्रागा केला. अखेर हे सर्व प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन बिल्डरने दिले.