मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत असतानाच काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी, प्रियांका गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची माहिती नाना पटोले यांची दिली.
पटोले यांनी सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. पक्षाच्या संघटनात्मक बांधनीसाठी चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती दिली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबतही राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. तसेच राहुल गांधी यांच्याशी महाराष्ट्राचं राजकारण आणि पक्ष संघटनेवर चर्चा केली. येणाऱ्या कालावधीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी रणनीती आखण्यात आल्याचेही पटोले यांनी सांगितले.
“महाराष्ट्राच्या सत्तांतरावेळी तत्कालीन राज्यपालांची भूमिका चुकीची होती. भाजप संविधानिक व्यवस्थेला नष्ट करण्याचं काम करतंय. भाजपचा खरा चेहरा सुप्रीम कोर्टाने समोर आणला. सध्याचं सरकार असंविधानिक आहे. हे कोर्टाने सांगितलं. आम्ही पण तेच म्हणत होतो. भाजपमध्ये नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा. कोर्टाने स्पष्ट केलंय की सरकारचा पायाच चुकीचा आहे”, असं नाना पटोले म्हणाले.