मुंबई ; बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय परिसरात वय वर्षे ३ ते १२ दरम्यानच्या क्षयरोगबाधित बालकांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र बालक्षयरोग कक्ष लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या बालक्षयरोग कक्षामुळे ३ ते १२ वर्षादरम्यानच्या क्षयरोगबाधित बालकांवर प्रभावी उपचार करून त्यांच्या सदृढ आरोग्यासाठी योग्य ती पावले उचलण्यास मदत होणार आहे.
क्षयरोग रुग्णालय हे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये रुपांतरीत करून सर्व प्रकारच्या क्षयरोगबाधित रूग्णांना एकाच छताखाली उपचार मिळावेत, या उद्देशाने या बालक्षयरोग कक्षाची सुरूवात करण्यात येणार आहे. याबरोबरच क्षयरोग रुग्णालयातील आरोग्य सुविधांना देखील बळ देण्यात येणार आहे. यासाठी दोन तज्ज्ञ वैद्यकीय सल्लागार अर्थात ‘बालरोग तज्ञ’ (SMC Pediatrics) यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय परिसरात वय वर्षे ३ ते १२ दरम्यानच्या क्षयरोगबाधित बालकांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र बालक्षयरोग कक्ष सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कक्षात उपचारार्थ येणाऱ्या बालकांना आवश्यकतेनुसार रूग्णालयात दाखल करणे गरजेचे वाटल्यास बालकाच्या पालकांना विहित कालावधीकरिता बालकांसोबत रूग्णालयात थांबता येणार आहे.
नव्याने सुरू करण्यात येणारा बालक्षयरोग कक्ष हा सध्याच्याच क्षयरोग रुग्णालय परिसरात कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रस्तावित कक्षामध्ये २० रूग्णशय्या (खाटा) असणार आहेत. यामध्ये १० खाटा या औषधरोधी क्षयरोगाची बाधा झालेल्या (Drug Resistant) बाल रूग्णांसाठी असणार आहेत. तर १० खाटा औषधसंवेदीत (Drug Sensitive) बाल रुग्णांसाठी असणार आहेत. भविष्यात गरज भासल्यास या कक्षाची क्षमता ४० ते ५० खाटांपर्यंत वाढविता येऊ शकणार आहे. ‘क्षयमुक्त मुंबई’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करण्यात येत असून प्रस्तावित बालक्षयरोग कक्ष हा त्याच प्रयत्नांचा भाग आहे, अशी माहिती डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.
..
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. गोमारे यांनी सांगितले की, ३ ते १२ हा वयोगट सामाजिकरित्या संवेदनशील मानला जातो. यामुळे या बालकांवर प्रभावी उपचार करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांची देखील आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन क्षयरोग रूग्णालयातील प्रस्तावित बालक्षयरोग कक्षासाठी दोन तज्ज्ञ वैद्यकीय सल्लागार अर्थात बालरोग तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रियेबाबतचा तपशील व संबंधित माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दि. २५ मे २०२३ अशी आहे. तरी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा, असेही आवाहन यानिमित्ताने संबंधितांना करण्यात आले आहे.