मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नाल्यांमधून दरपवर्षी पावसाळापूर्व गाळ काढण्याची कामे केली जातात. पावसाळापूर्व गाळ काढण्याचे यंदा उद्दिष्ट ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन इतके आहे. यापैकी आजपर्यंत ७ लाख ६८ हजार ३६२ मेट्रिक टन म्हणजे पावसाळापूर्व निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत ७८.४१ टक्के गाळ काढला आहे. गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. दोन सत्रांमध्ये आणि आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ व संयंत्रे नेमून ही कामे करण्यात येत आहेत. ३१ मे २०२३ पूर्वी निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पश्चिम उपनगरांमध्ये काही नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची आमदार आशीष शेलार यांनी पाहणी केली. गाळ काढण्याची कामे योग्यरितीने सुरु असल्याचे शेलार यांनी सांगितल. मुंबई महानगरात असलेल्या नाल्यांमधून वर्षभर गाळ काढण्याची कामे केली जातात, एकूण गाळापैकी पावसाळापूर्व ७५ टक्के गाळ काढण्यात येतो. दरवर्षाप्रमाणे यंदादेखील मुंबईतील एकूण १८८ मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याचे काम हाती घेतले असून त्यांची एकूण लांबी २६८ किलोमीटर इतकी आहे. तर लहान व रस्त्यालगतचे असे मिळून सुमारे २ हजार १०० किलोमीटर लांब अंतराच्या लहान नाल्यांमधून देखील गाळ काढण्यात येत आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.