मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन पुन्हा शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही इशारा दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकारची अवहेलना झाली आहे. महाराष्ट्राची अवहेलना थांबवली पाहिजे. मी जसा राजीनामा दिला तसा बेकायदेशीर सरकारने राजीनामा दिला पाहिजे. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या निकाल देताना इकडे काही वेडंवाकडं केलं तर आम्ही कोर्टात जाऊ. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, असा इशारा दिला. मात्र त्यानंतर जी बदनामी होईल, त्यामुळे यांना जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. अध्यक्षांनी परदेशातून यावं आणि निकाल लावावा, अशी मागणी वजा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे एका पत्रकार परिषदेत दिला.

उध्दव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने जो पोपट ठेवला आहे. तो हालत नाही. निश्चल आहे. तो बोलत नाही हे सांगून तो मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम विधानसभा अध्यक्षांकडे दिलं आहे. नार्वेकरांना राजकीय प्रवासाची कल्पना आहे. तो कसा करायचा हे त्यांना चांगलं कळतं. जगात महाराष्ट्राची अवहेलना सुरू आहे. ती अधिक होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे, असं ठाकरे यांनी सांगितलं.

राज्यात जी काही बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर कोर्टाने परखड भाष्य केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना मराठी माणसासाठी आणि हिंदुच्या रक्षणासाठी स्थापन करून जपली. अशी शिवसेना गद्दारांच्या माध्यमातून आपल्या दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडला आहे. हिंदुत्वाच्या बुरख्या खालचा भेसूर चेहरा उघडा पाडला आहे. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही जणांनी काल आनंदोत्सव साजरा केला. भाजपने आनंद साजरा केला ते समजू शकतो. कारण डोईजड झालेलं ओझं उतवरण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. पण गद्दारांना आनंद होण्याची गरज काय ? असा खोचक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. हे सरकार बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणांवरुन सिद्ध झाले. शिंदे-फडणवीस सरकारला मिळालेले हे जीवनदान तात्पुरते आहे. त्यामुळे या बेकायदेशीर सरकारने नैतिकतेला जागत राजीनामा दिला पाहिजे. एवढे सगळे धिंडवडे निघाल्यानंतर आपण सगळे निवडणुकीला सामोरे जाऊयात. सर्वात शेवटचे न्यायालय हे जनतेचे आहे. त्यामुळे आपण हा फैसला जनतेवर सोपवुयात, जनता देईल तो कौल आपण स्वीकारू, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला निवडणूक घेण्याचे आव्हान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *