दिल्ली: देशाचे लक्ष वेधलेल्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल आज लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेवर यावेळी महत्वाचा निर्णय होणार आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या भवितव्याचा फैसला या निकालातून ठरणार असून, सरकार जाणार की तरणार ? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरू होती. या घटनापीठात सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, यांच्यासह न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यामूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे. यातल्या न्यायमूर्ती एम. आर. शहा हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे तत्पूर्वी हा निकाल येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तत्पूर्वीच आज निकाल लागणार आहे.
अकरा महिन्यांपूर्वी अर्थात जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आपल्या 40 सहकारी आमदारांसह बंड केल्यानं राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. अनेक दिवस सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळं अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरू होती.त्याचा निकाल आज लागणार आहे
आजच्या निकालातून राज्यातील शिंदे सरकार वैध आहे की नाही? फुटलेल्या 16 आमदारांना पक्षांतर बंदी कायदा लागू होतो की नाही? अशी अनेक प्रश्नाची उत्तरे यातून स्पष्ट होणार आहेत.
‘ते’ 16 आमदार
1) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार
3) संदीपान भुमरे
4) संजय शिरसाट
5) तानाजी सावंत
6) यामिनी जाधव
7) चिमणराव पाटील
8) भरत गोगावले
9) लता सोनावणे
10) प्रकाश सुर्वे
11) बालाजी किणीकर
12) अनिल बाबर
13) महेश शिंदे
14) संजय रायमुलकर
15) रमेश बोरणारे
16) बालाजी कल्याणकर