डोक्यावरचा भार आता वाहनावर .. रायगडमध्ये कापणी, झोडणी जोरात
महाड (निलेश पवार) – भात कापणी सुरु झाली कि रायगडमधील कांही भागात डोक्यावरून एका रांगेत भाताचे भारे वाहून नेणारे चित्र दृष्टीस पडत असे. पण हळू हळू काळ बदलत गेला. शेतीमध्येही प्रगती झाली. अत्याधुनिक अवजारे आली. तसेच डोक्यावर भारे वाहून नेण्याचे दिवसही मागे पडले. आता भारे वाहून नेण्यासाठी वाहनांचा वापर होऊ लागलाय.
दिवाळी होताच आता रायगडमध्ये सर्वत्र भात कापणी जोमाने सुरु आहे. भात कापणी झाल्यानंतर रायगडमधील पेण, पनवेल भागात तत्काळ भात झोडणी केली जाते मात्र माणगाव, महाड, पोलादपूर, आदी भागात भात कापणी झाली कि या भाताचे भारे बांधले जातात. त्यानंतर हे भारे डोक्यावरून वाहून आणून एका जागी रचले जातात. याला उडवी असे म्हटले जाते. हि उडवी कांही महिन्यानंतर काढली जातात आणि मळणीच्या कामाला सुरवात होते. महाड पोलादपूर तालुक्यात अजून भात कापणी अनेक ठिकाणी सुरु असून भाताचे भारे रचण्याचे काम सुरु आहे. गेली अनेक पिढ्या हे भाताचे भारे डोक्यावरून वाहून आणले जातात. याकरिता मोठ्या शहरात नोकरीनिमित्त असलेले चाकरमनी देखील भात कापणीसाठी एक दोन दिवसाची सुट्टी घेऊन येतात. खेडेगावात आज देखील डोक्यावरून भाताचे भारे वाहून नेण्यासाठी लहान मुले देखील उत्सुक असतात. मात्र आता काळ बदलत गेला आहे. बदलत्या काळानुसार भाताचे भारे वाहून नेण्यासाठी आता वाहनाचा वापर होऊ लागला आहे. खेडेगावातून आता सर्वत्र रस्ते झालेले आहेत. शिवाय माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची देखील सुविधा झाल्याने आता रस्त्यालगत असलेल्या गावातून भाताचे भारे वाहण्यासाठी वाहनांचा वापर केला जात आहे. एका जागी वाहन उभे करून हे भारे या वाहनातून वाहून नेले जात आहेत. यामुळे कांही अंशी मेहनत कमी झाली असली तरी वाहतूक खर्च वाढला आहे. यामुळे भात शेती तशीही न परवडणारी झालीय.