मुबई : भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाने जगभरात आपली मोहोर उमटवली आहे असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत पार पडलेल्या 49व्या भारतीय रत्ने आणि आभूषणे पुरस्कार सोहळ्यात केले. प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात देखील उत्तम प्रदर्शन केल्याबद्दल या क्षेत्राची गोयल  प्रशंसा केली.

 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत, 49व्या भारतीय रत्ने आणि आभूषणे पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त निर्यातदारांचा  सत्कार करण्यात आला. रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदेद्वारे दिल्या जाणाऱ्या ह्या पुरस्कारात, या क्षेत्रातील, प्रमुख निर्यातदारांच्या कार्याचा सन्मान केला जातो. आजच्या कार्यक्रमात, गोयल यांनी 28 प्रमुख निर्यातदार आणि सुविधा प्रदात्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेल्जियमचे महावाणिज्य दूत, फ्रँक गीर्कन्स, GJEPC चे अध्यक्ष विपुल शहा, ईसीजीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सेंथिलनाथन, सिप्झचे विकास आयुक्त श्याम जगन्नाथन, पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक आर.के. मिश्रा, जीजेईपीसीचे उपाध्यक्ष किरीट भन्साली, पीएमबीडी, जीजेईपीसीचे सह संयोजक निलेश कोठारी, कार्यकारी संचालक सब्यसाची रे, वरिष्ठ सरकारी अधिकारी, बँकिंग क्षेत्रातील अधिकारी, विविध संघटना आणि निर्यात प्रोत्साहन परिषदेचे पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते.

भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाविषयी बोलतांना, गोयल म्हणाले की, आपल्या दागिन्यांचे डिझाईन्स, त्यातील सौन्दर्य आणि आधुनिकता तसेच परंपरा यांचा अचूक मेळ यांचे प्रतिबिंब आपल्या उत्पादनांमधे दिसत, असून भारताने या उद्योगात अत्यंत महत्वाचे स्थान मिळवले आहे, हेच ही उत्पादने सिद्ध करतात. भारतीय रत्ने आणि आभूषणे क्षेत्र, आपली यशोगाथा यापुढेही नेत, देशातील युवकांसाठी लक्षावधी रोजगार आणि संधी निर्माण करत राहील, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “देशात अधिकाधिक उद्योगपूरक वातावरण निर्माण होईल, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, जेणेकरून तुमच्यासारख्या सर्व उद्योगांना आपले व्यवसाय प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे करता येतील,” असे गोयल पुढे म्हणाले.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, रत्ने आणि आभूषणांची एकूण निर्यात 2.48% ने वाढून 300462.52 कोटी रुपये झाली होती. गेल्या वर्षी याच कालावधीत ही निर्यात 293193.19 कोटी रुपयांची झाली होती. अमेरिकन डॉलर्सच्या संदर्भात सांगायचे झाल्यास,रत्ने आणि आभूषणांची एकूण निर्यात 37468.66 दशलक्ष डॉलर्स इतकी होती जी गेल्या वर्षी याच कालावधीत 39331.71 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. 

रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदे (GJEPC) विषयी माहिती

 भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 1966 रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदेची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर जेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्यास सुरुवात केली, तेव्हा देशाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या अनेक निर्यात प्रोत्साहन परिषदांपैकी ही एक आहे. 1998 पासून, जीजेईपीसीला स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे. जीजेईपीसी ही रत्ने आणि आभूषण उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे आणि आज या क्षेत्रातील 9000 उद्योजकांचे ती प्रतिनिधित्व करते. मुंबईत या संस्थेचे मुख्यालय असून, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, सुरत आणि जयपूर इथे प्रादेशिक केंद्रे आहेत. अशाप्रकारे या संस्थेचा अतिशय व्यापक आवाका असून आपल्या सदस्यांना थेट आणि अधिक अर्थपूर्ण पद्धतीने सेवा देण्यासाठी ही संस्था त्यांच्या सतत संपर्कात असते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!