चायनीज हॉटेलमध्ये बीलावरून वाद , ग्राहकाच्या अंगावर फेकले उकळते तेल
उल्हासनगर : चायनिजच्या हॉटेलमध्ये खाण्याच्या बिलावरून झालेल्या वादात चायनीजच्या मालकाने गिऱ्हाईकांच्या अंगावर उकळते तेल फेकण्याची घटना घडली आहे . यात एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे . याप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत .
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या व्हीनस चौकात रात्री 11 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला .दीपक म्हस्के व त्याचे काही मित्र मनोज चायनीज कॉर्नर या हॉटेलमध्ये जेवत होते जेवण झाल्यावर हॉटेलचा मालक भोलाप्रसाद राय व दीपक म्हस्के यांच्यात वाद झाला . यावेळी संतप्त झालेल्या हॉटेलच्या नोकराने दीपकच्या अंगावर कढईतील उकळते तेल टाकले . यामुळे दिपकच्या चेहरा व मानेवर गंभीर जखम झाली आहे . तर भोलाप्रसाद राय याने दीपक म्हस्के व त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात मारहाण केल्याचा परस्परविरोधी तक्रार केल्याने पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी चायनीजचे हॉटेल , दुकाने असून अनेक ठिकाणी परवाना नसतांना दारू देखील पुरवली जाते. यामुळे रात्री उशिरापर्यंत मद्यपींचा धिंगाणा सुरू असतो. पोलिस यंत्रणा देखील याबाबत बघ्याची भूमिका घेत असतात. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे वाढत चालले आहेत . या प्रकरणी परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांना विचारले असता ते म्हणाले की या संदर्भात आम्ही अधिक तपास करीत आहोत