जपान, ता. २० : आज जपानमध्ये क्योटो येथील निशजिन सेंटरमध्ये काकुरी नावाच्या यंत्रातून रेशीम काढण्याचे सहज साध्य साधन मला जपानमध्ये पाहायला मिळाले. या केंद्रात कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष दालने आहेत. टेक्स्ट टाईल म्युझियम सोबत पारंपरिक कपड्यांची, हस्तकला वस्तू आणि दागिन्यांची खास दालनेही येथे उभारली आहेत. हस्तकला, पारंपरिक कपडे धारण करण्यासाठी तसेच हाताने सुत कातण्याचा अनुभव देणाऱ्या येथे सुविधा आहेत.
याबाबत माहिती देताना उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, आपल्याकडेही रेशीम उद्योग आणि उत्पादन घेण्यात येते. तिथे तयार होणाऱ्या स्थानिक पारंपरिक वेशभूषा किमोमो तयार करण्यासाठी इथे वस्त्र निर्मिती होते. रेशीम उद्योगातील तयार कपड्याचे संग्रहालयदेखील येथे पाहायला मिळाले. आपल्याकडेही भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने रेशीम उद्योगास प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. यात येवल्याची पैठणी, खादी ग्रामोद्योग, उमेद सारख्या योजनाच्या माध्यमातून अनेक स्वरूपाचे प्रयत्न झाले आहेत.
मात्र या ठिकाणी पाहायला मिळालेली डिझाईन्स आणि कारागिरी जर आपण आपल्याकडेही आत्मसात केली तर आपल्याकडच्या मालाला देखील जागतिक दर्जाची बाजारपेठ मिळू शकेल. प्लास्टिकच्या बाजारात होत असलेल्या अतिक्रमणावर मात करण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यात कलाकुसरीने सौंदर्य वाढवणाऱ्या अनेक वस्तूंचे उत्पादन करणारे कलाकार, शेतकरी, उद्योजक या सर्वांना हे अतिशय उपयोगाचे होईल असे माझे मत आहे. ज्यांना या कामाचे महत्त्व माहिती आहे त्यांना तर हे फारच उपयुक्त आहे., असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.
त्या म्हणाल्या, “पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आमदार संजय जगताप यांनी याबाबत चालना देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ह्या ठिकाणी भेट दिल्यावर त्यांच्या आणि माझ्या डोळ्यासमोर ग्रामीण भागातील रेशीम उद्योग आणि त्यात काम करणाऱ्या लोकांसाठी अशा प्रकारच्या केंद्रांची उभारणी करण्याचा विचार आला.
या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने अधिकाधिक फायदा या लोकांना कसा होईल याकडे आम्ही विचार करत आहोत. अशी केंद्रे अधिक अत्याधुनिक करता येतील. विशेषतः महिला कारागिरांना यातील कौशल्याचे प्रशिक्षण देता येईल. महिलांसाठी विकासाची ही एक सुसंधी आहे, असे मला वाटते.” याचबरोबर नाशिक जिल्ह्यात येवला परिसरातही पैठणी उत्पादकांसाठी अशाच प्रकारचे प्रयत्न करणार असल्याचे आ. किशोर दराडे यांनी सांगितले आहे.