२१ व्या शतकाला नवी शक्ती देण्याचे सामर्थ्य महाराष्ट्रात
– राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नागपूर : संगीत, साहित्य व कला क्षेत्रात महाराष्ट्राने अनेक रत्न देशाला दिले. दलित समाजाच्या उत्थानासाठी महाराष्ट्राने नवी दिशा दाखविली. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यासारख्या थोर विभूतींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या महाराष्ट्राशिवाय राष्ट्राची ओळख असू शकत नाही. त्यामुळे २१ व्या शतकाला नवी शक्ती देण्याचे सामर्थ्य महाराष्ट्र राज्यात असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार व महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कविवर्य सुरेश भट यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती म्हणाले की, राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर आपण दोन महत्वाचे निर्णय घेतले. राष्ट्रपती म्हणून राजधानी बाहेर पहिला दौरा सुरक्षा दलाचा सन्मानासाठी करण्याचा आणि दुसरा दौरा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतलेल्या दीक्षाभूमीला भेट देण्याचा. राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपतींनी कुठल्याही राज्यातील पहिला दौरा राज्याच्या राजधानीत करावा असे संकेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने दुसरा निर्णय पूर्ण करण्याची मनोकामना आज पूर्ण झाल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
मराठी कविता व साहित्याला नवी उंची देण्याचे काम कविवर्य सुरेश भट यांनी केले असून त्यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले. महाराष्ट्राला साहित्य व लोककलेची मोठी परंपरा असून लोकनाट्य व तमाशा यासह अभिनय, संस्कृती व कलेचे महाराष्ट्र केंद्र राहिले आहेत. कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या माध्यमातून कलेचा हा वारसा जपण्याचे काम महानगरपालिकेने केल्याचे राष्ट्रपती म्हणाले. विकास आणि परिवर्तनाचादृष्टीने महाराष्ट्राने देशासमोर उदाहरण ठेवले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या विकासाला नवी गती प्रदान केली आहे. नागपूर शहराने शिक्षण, आरोग्य व मुलभूत सुविधा क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली असून साक्षरतेत नागपूर जिल्हा राज्यात पहिला असल्याचे सांगून राष्ट्रपती यांनी नागपूर जिल्हावासीयांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र हे महान राज्य असून महापुरुषाची महागाथा असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
नागपूरमध्ये भव्य ॲम्फी थिएटर उभारणार – मुख्यमंत्री
देशातील एकाही महानगरपालिकेने उभारले नसेल असे ऐतिहासिक सभागृह उभारुन महानगरपालिकेने कविवर्य सुरेश भट यांना खरी आदरांजली अर्पण केली आहे. कविवर्य सुरेश भट सभागृह मराठी काव्य संगीत व साहित्याला नवा आयाम देणारे ठरेल. या भव्य सभागृहासोबतच नागपूर येथील धनवटे रंगमंदीराची पुन्हा उभारणी व ॲम्फी थिएटर उभारणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कविवर्य सुरेश भट यांनी मराठी साहित्याला समृद्ध करण्याचे काम केले. सुरेश भट यांची पहिली भेट आजही आपल्याला आठवते. सुरेश भट हे जिंदादील कवी होते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महानगरपालिकेने उभारलेले सुंदर सर्वोत्तम सभागृह नागपूरला नवी ओळख निर्माण करुन देणार आहे. नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या या सभागृहामुळे रसिकांना चांगली नाटकं व सांस्कृतिक कार्यक्रम बघायला मिळतील आणि कलावंतांची उत्कृष्ठ नाट्यगृहाची मागणी पूर्ण होईल असेही ते म्हणाले. कविवर्य सुरेश भट सभागृह उभारण्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
देशासाठी गौरवशाली सभागृह – नितीन गडकरी
सुरेश भट हे प्रतिभाशाली कवी, पत्रकार व साहित्यिक होते. त्यांनी आपल्या गजल व कवितांनी मराठी मनावर राज्य केले. अशा प्रतिभाशाली कविच्या नावाने सुसज्ज सभागृह असावे अशी स्वप्न आम्ही पाहिले होते. आणि आज ते प्रत्यक्षात उतरले आहे. या सभागृहाचे भाडे सर्वसामान्य कलावंत व रसिकांना परवडावे यासाठी ते पाच हजार असावे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र गुणवंतांचा खजिना आहे. कविवर्य सुरेश भट यांनी आपल्या शब्दांनी मराठी सारस्वताचा गौरव वाढविला. त्यांच्या नावाने असलेले हे सभागृह इतिहास साहित्य व संस्कृतिला प्रगल्भ करण्याचे केंद्र ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा, कॉलेज यांचेसह छोटे-छोटे कार्यक्रम या सभागृहात व्हावे यासाठी अत्यल्प म्हणजे पाच हजार रुपये भाडे मनपाने ठेवावे अशी सूचना त्यांनी केली. शहरी भागासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र शासनाने दिलेली ही भेट असल्याचे गडकरी म्हणाले. “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी” या कविवर्य सुरेश भट यांचा गिताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. महापौर नंदा जिचकार यांनी शाल, श्रीफळ व मानचिन्ह देवून राष्ट्रपतींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचलन जयप्रकाश गुप्ता यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी मानले. या कार्यक्रमास कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.