मुंबई काँग्रेसने घातले, भाजप सरकारचे श्राध्द : पिंडदान करून काँग्रेस कार्यकत्यांनी केले मुंडन
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर केलेल्या नोटबंदीला आज एक वर्ष पूर्ण झाले मात्र नोटबंदीमुळे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांसाठी मुंबई काँग्रेसच्यावतीने आझाद मैदानात भाजप सरकारचे श्राध्द घालण्यात आले. यावेळी धार्मिक पध्दतीने पिंडदान करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंडण केले. काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी सारखा अत्यंत अघोरी निर्णय जाहिर केला. यामुळे देशातील भ्रष्टाचार, काळा पैसा, आतंकवाद, खोटया नोटा हे सगळे बंद होईल असे सांगण्यात आले मात्र यापैकी कोणतेच ध्येय साध्य झाले नसल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली. नोटबंदीमुळे गरीब जनता व सर्व सामान्य माणूस देशोधडीला लागला. स्वतःचेच कष्टाचे पैसे काढताना जनतेचे हाल झाले. ११५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या अघोरी निर्णयाला १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या निर्णयाचा निषेध करीत असल्याचे निरूपम यांनी सांगितले. ५०० व १००० च्या नोटा बंद करून २००० च्या नोटा आणून भ्रष्टाचार वाढवला आहे. नोटाबंदीमुळे अनेक तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक उद्योगधंदे बंद पडले, जीडीपी घसरला, आतंकवाद वाढला, रोज भारताच्या सीमेवर आपले जवान शहीद होत आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाची जाहीरपणे माफी मागावी असेही निरूपम म्हणाले. यावेळी खासदार हुसेन दलवाई आणि रजनी पाटील, माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री सुरेश शेट्टी आणि चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार चरणसिंग सप्रा, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर, सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
मोदी भ्रष्टाचाराला पाठीशी, निरूपम यांचा आरोप
पनामा आणि पॅराडाईस पेपर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी आणि भाजपा सरकारचे काही मंडळी असल्यामुळेच मोदी या प्रकरणांची चौकशी आणि कारवाई करत नाहीत. “ना खाउंगा ना खाणे दुंगा” बोलणारे मोदी हे स्वतः भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. जय अमित शहा याची चौकशी का केली जात नाही ? पनामा आणि पॅराडाईस पेपर मध्ये महानायक अमिताभ बच्चनचे नाव आले आहे. अमिताभजी भाजपाचे ‘‘सदिच्छा दूत’’ आहेत. नरेंद्र मोदी यांचे नाव सहारा व बिर्ला डायरी मध्ये होते, त्याची चौकशी झालेली नाही. नरेंद्र मोदी यांचे सर्व सहकारी भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत पण त्यांची चौकशी किंवा त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. पण व्यापारी आणि उद्योजक यांच्या मागे सीआयडी, इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा ससेमिरा लावला जातो असा घाणाघाती आरोप निरूपम यांनी केला.