आजपासून राज्यात अवयवदान जनजागृती चळवळीचा शुभारंभ, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
मुंबई, दि. ६ : सध्या भारतात मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी २ लाख मूत्रपिंड आणि १ लाख यकृताची गरज आहे, मात्र दरवर्षी केवळ ४००० मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि ५०० यकृत प्रत्यारोपण केले जात असून हजारो रुग्ण नवीन आयुष्य जगण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत अवयवांअभावी मृत्युमुखी पडत आहेत.
हृदयाची परिस्थिती आणखी बिकट असून, पाच हजार रुग्णांना हृदयाची गरज आहे. केवळ २० ते ३० हृदय प्रत्यारोपण केले जात आहे. आज अवयव मिळत नसल्याने किडनी प्रत्यारोपण व लिव्हर प्रत्यारोपण करण्याकरिता बरीच प्रतीक्षा यादी आहे.
५० वर्षांनंतरही भारतात अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे अवयवदानाची चळवळ जोमाने सुरू करण्यासाठी राज्यात उद्या शुक्रवार ७ एप्रिलपासून अवयवदान जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार असून राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबविले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अवयवदानाबाबत अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग काम करणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबविणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन सेंटरची संख्या वाढवून गरीब व गरजू रुग्णांसाठी शासकीय संस्थांमध्ये परवडणाऱ्या प्रत्यारोपण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक शासकीय संस्थेत अवयवदान जनजागृती अधिकारी यंत्रणा समाविष्ट करून विद्यमान रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन आहे.
आधीच उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांमध्ये समावेश करून तसेच त्यासाठी आर्थिक देणगीदारांचा पूल तयार करून प्रत्यारोपणाच्या आर्थिक ओझ्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत उपाय शोधले जात असल्याचे महाजन यांनी सांगितले. अवयव दान केल्यानंतर देखील त्या अवयवाचे तात्काळ प्रत्यारोपण करणे देखील तेवढेच आवश्यक असते. त्याकरिता सर्वत्र अवयव प्रत्यारोपनाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
त्याकरिता अवयव प्रत्यारोपण बाबतची सुविधा सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अवयवदानाच्या कार्यपद्धतीची चांगली माहिती व्हावी आणि त्यांचे सर्व गैरसमज समाधानकारक आणि वैज्ञानिकदृष्ट्या दूर होतील यासाठी अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून अवयवदानासाठी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात अवयवदात्यांची संभाव्य यादी वाढविणे हे उद्दिष्ट आहे.
जगातील पहिले मानवी अवयव प्रत्यारोपण १९५४ मध्ये झाले, तर भारतात १९७१ मध्ये सीएमसी वेल्लोर येथे करण्यात आले. ५० वर्षांनंतरही भारतात अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आज आपल्याकडे जे काही अवयव प्रत्यारोपण होत आहे त्यात बहुसंख्य थेट संबंधित दात्यांकडून आहेत, तर ब्रेनडेड रुग्णांचे कॅडेव्हरिक अवयवदान नेहमीच मागे राहिले आहे.
या उदात्त आणि मानवी कारणासाठी पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात दहा हजारांपैकी केवळ एक रुग्ण अवयवदानासाठी संमती देतो, तर पाश्चिमात्य देशांत १० हजार लोकसंख्येपैकी सुमारे ३५०० लोकांमध्ये अवयवदानासाठी संमती मिळते.
एक ब्रेन डेड रुग्णांमुळे ७ अवयव गरजू रुग्णाचे जीव वाचू शकतात परंतु ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकाकडून गैरसमजामुळे अवयव दान करण्यात येत नाही. अवयव दान चळवळी मधून हा गैरसमज दूर केल्यास अवयव दानाचे प्रमाण नक्कीच सुधारते. अवयव निकामी झालेल्या रुग्णास अवयव मिळाल्यानंतर केवळ त्याचाच जीव वाचत नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण कुटुंब पूर्ववत होते. त्याकरिता अवयव दानाची मोठ्या प्रमाणात चळवळ उभा राहणे आवश्यक आहे व त्यातून अवयवदान प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्याकरिता अवयव दानाची चळवळ जोमाने सुरू करण्यात येत आहे असे महाजन यांनी सांगितले.
सध्या भारतात सुमारे ५७० अवयव प्रत्यारोपण केंद्रे असून केवळ १४० नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर्स आहेत, जी लोकसंख्येच्या सध्याच्या गरजेनुसार खूपच कमी आहेत. दुसरं म्हणजे यातील बहुसंख्य खाजगी संस्था आहेत, जिथे उपचारांचा खर्च सर्वांना परवडणारा नाही. राज्यात नेत्र व त्वचा बँका आणि नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटरही फारच कमी आहेत. जेव्हा लोकसंख्येने हे पारंपारिक प्रत्यारोपण स्वीकारले नाही, तेव्हा हात प्रत्यारोपणासारख्या नवीन पद्धतींचा विचार करणे खूप कठीण आहे. मूत्रपिंडाच्या आजारामुळे ग्रासित रुग्णांना वारंवार डायलिसिस करावं लागतं. सदर आजारांमुळे फक्त रुग्ण नसून तर रुग्णांचा परिवार सुद्धा त्यामध्ये गुंतला जातो व पीडित परिवाराला हळूहळू विविध आव्हानांना उत्तर द्यावी लागतो.
राज्यातील ११ कोटी २३ लाख लोकसंख्येतून केवळ ४९ हजार अवयवदानाची शपथ घेऊन महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी केवळ ७२ केंद्रे, यकृत प्रत्यारोपणासाठी ३६ केंद्रे आणि हृदय प्रत्यारोपणासाठी ९ केंद्रे असून इतर प्रत्यारोपणासाठी फारच कमी केंद्रे आहेत. रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात, त्यापैकी अनेक जण उपचारादरम्यान ब्रेनडेड होतातअसाच एक ब्रेनडेड रुग्ण २ मूत्रपिंड १ यकृत, १ हृदय, २ फुफ्फुस,१ स्वादुपिंड यांचे संभाव्य दाता असून एकाच वेळी ७ जीव वाचवू शकतो तसेच कॉर्निया, त्वचा, हाडे यासारख्या ऊतींचे दान करू शकतो आणि अपंग रुग्णांना विविध अपंगत्वापासून मुक्त होण्यास मदत करू शकतो असे महाजन यांनी सांगितले.