आदित्य ठाकरेंचा शिंदे -फडणवीस सरकारला थेट इशारा
ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या ठाण्यातील पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेली मारहाण आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्यावतीने आज ठाण्यात पोलीस मुख्यालयावर जनक्षोभ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले, यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. हे काही दिवसांचं नाही, हे तर काही तासांचं सरकार आहे. राज्यात गुडांच सरकार राहू देणार नाही. आम्ही कधी बदल्याच्या भूमिकेने काम करत नाही. मात्र जे लोकांच्या भल्याचं आहे, ते केल्याशिवाय राहणार नाही, हे आज तुम्हाला सांगायला मी आलो आहे. जे कोणी अधिकारी असतील किंवा गद्दार गँगमधील चिलटं असतील त्यांना सांगतोय, सरकार आल्यानंतर चौकशी करणार म्हणजे करणार आणि जेलभरो आंदोलन करणार. आज जे आंदोलन करतायत त्यांना नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकणार. हीच शपथ घ्यायला आज दिघे साहेबांच्या शक्तिस्थळावर आलो आहे,’ अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला.
रोशनी शिंदे यांच्या मारहाण प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केल्यानंतर आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एकत्र जमले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे खासदार राजन विचारे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “कालपासून मला लोकांच्या मनात जो संताप दिसत आहे, या गद्दारांच्या सरकारबद्दल राग दिसत आहे, संपूर्ण महाराष्ट्रात ही ठिणगी पडली आहे. ठाण्यात कालदेखील आलो. आज आल्यानंतर माझ्या गाडीचे काच खालती करुन असताना जिथे जिथे थांबलो, मग बसमधील लोकं असतील, फुटपाथवरील लोकं असतील, रिक्षामधील लोकं असतील, सगळे मला थम्स अप करुन सांगतात की तुमच्यासोबत आम्ही आहोत. एवढी मोठी घटना ठाणे शहरात झाली. जेव्हा एका गद्दार गँगचे आणि पक्षाचे कार्यकर्ते भिडतात. मिंधेंच्या लोकांनी शिंदे ताईंना मारलं. पोटात मारलं, ती ताई प्रेग्नंट असेल किंवा नसेल पण एका महिलेवर हात-पाय उचलले जातात. लाथा मारल्या जातात. कशासाठी तर एक पोस्ट टाकल्यामुळे. कुठेही काही कोणाकडून उत्तर येत नाही. पोलीस ठाण्याला गेलो तर तक्रार नोंद केली जात नाही. जणू काही मोगलाई आपल्या राज्यात आलीय. तशी आलीच आहे. कारण सगळे बाहेरुन आक्रमण होत आहेत”, अशी टीका त्यांनी केली.
ठाण्यातून निवडून लढविण्यास तयार, मुख्यमंत्रयांना खुले आव्हान !
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करायला आलो. ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यापूर्वी या बालेकिल्ल्याला मानत होते आता ते मानत नाही याच ठाण्यात मी या घटनाबाह्य मुख्यमंत्रयाचया विरोधात लढायला तयार असल्याचे सांगत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले आहे तुम्ही मला निवडून द्या मी राज्याला छळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सुसंस्कृत ठाणं म्हणून आपण ओळखतो त्या ठाण्याला आपण काल इतकं भयानक बदनाम करतोय. महिलेला मारहाण करता. तुम्ही माफी मागण्याच्या लायकीचे नाहीत. तुम्हाला माफ करणारही नाहीत”, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला. कधी आम्ही बदल्याच्या भूमिकेत काम करत नाहीत. पण लोकांसाठी जे गरजेचं आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत. जे कुणी ऑफिसर त्या गद्दार गँगचे असतील त्यांना सांगतोय मी, सरकार आल्यानंतर चौकशी करणार म्हणजे करणार आणि जेलभरो आंदोलन करणार. तुम्हाला जेलमध्ये भरणार. हीच शपथ मी दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावर मी घेतली आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्रयांची मिमिक्री अन् वन्स मोअर ….
यावेळ आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार करीत त्यांची मिमिक्री देखील केली. या मिमिक्रीमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच हंशा पिकला. “शर्ट खालती-वरती करीत, वर-खाली बघून दाढी खाजवत ते महिलांबद्दल अभद्र भाषा बोलतात.” या वेळी आदित्य ठाकरे यांच्या हावभावावरून उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला. अनेकांनी वन्स मोअरचे नारे दिले. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, वन्स मोअर नाही, असे लोक ‘ओनली वन्स’ होतात, त्यांना परत येऊ द्यायचे नाही.
पोलीस आयुक्त पळून गेले…
आपल्याला आज १७ अटी आलेल्या आहेत. मोर्चा काढायचा असेल तर अमूकच बोलू शकतात. टाका, आमच्या सगळ्यांवर केसेस टाका पुन्हा होऊन जाऊ दे. पोलीस आयुक्तांच्या ऑफिससाठी आम्ही एक टाळं आणलेलं आहे. कारण काल जेव्हा मिंधेंच्या गद्दार गँगच्या लोकांनी, टोळींनी जेव्हा शिंदे ताईंवर हल्ला केला, तेव्हा तक्रार घ्यायला तयार नव्हतं. उद्धव ठाकरे चिडून पोलीस आयुक्तालयात गेले तर पोलीस आयुक्त पळून गेले होते”, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.
ठाकरे बाणा म्हणजे तोफ, तोफेपुढे काडतुसाचा निभाव लागणार नाही : अंधारेंचा हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंधारे म्हणाल्या की, “रोशनी शिंदे एका सोशल मीडियाच्या पोस्टवर काहीतरी कमेंट करते. प्रकरण चिघळत जातं. बायका तिच्यापर्यंत पोहोचतात. तिला धमकवतात. ती माफी मागते. त्यानंतर तिला माफीचा व्हिडीओ तयार करायला सांगितला जातो. त्यानंतरसुद्धा तिच्या पोटात लाथा मारल्या जातात. काही माध्यमांनी काल असं म्हटलं की, सदर महिला ही गरोदर नाही. ती महिला गरोदर नसेल तरी पोलीस, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आम्हाला सांगावं की, एखादी मायमाऊली गरोदर नाही म्हणून तिच्या पोटात लाथा मारण्याचं परमीट तुम्हाला मिळतं का? तुम्ही उत्तर द्या”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांना फडतूस म्हणू नये मान्य मग दादा, भाऊ म्हटल्यावर तुमचे आमदार आम्हाला शिवीगाळ करतात, तर आम्ही काय करणार?, असे सुषमा अंधारे म्हणाले. या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांना महाष्ट्रात फिरु देणार नाही, या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा देखील सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला. “बावनकुळे यांच्यात हिंमत असेल तर त्यानी ४८ तासात मातोश्रीवर यावे,” असे थेट आव्हान त्यांनी यावेळी दिले. जर तुम्ही काडतूस आहात. तर ठाकरे बाणा म्हणजे तोफ आहे आणि तोफेपुढे काडतुसाचा निभाव लागणार नाही. प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करुन ठाकरेंसाठी उभा आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचेही भाषण झाले त्यांनीही शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.