नागपूर, 4 एप्रिल : उद्धव ठाकरे यांचा अडीच वर्षांचा कारभार पाहिल्यावर फडतूस कोण, हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक आहे, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केला.

उद्धव ठाकरेंच्या विधानाबद्दल माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन मंत्री जेलमध्ये गेल्यावर त्यांचा राजीनामा मागण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवित नाही आणि त्यांचा लाळघोटेपणा जे करीत असतात, त्यांना बोलण्याचा अधिकार तरी काय? जे वाझेच्या मागे लाळ घोटतात, ज्यांच्या काळात पोलिस खंडणी गोळा करतात, त्यांना बोलण्याचा अधिकार काय? अडीच वर्ष घरात घरात बसून राजकारण करणार्‍यांनी जास्त बोलू नये. आम्ही संयमाने वागतो याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असे नाही. ज्या दिवशी बोलणे सुरू करु, त्यादिवशी पळता भूई थोडी होईल.

नरेंद्र मोदीजींचे फोटो लावून निवडून येता आणि फक्त खुर्चीसाठी विरोधकांची लाळ घोटता, मग खरे फडतूस कोण, याचे उत्तर थयथयाट करणार्‍यांनी आधी दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला याचे उत्तर माहिती आहे. ते बोलले त्यापेक्षा खालची भाषा मला येते, मी नागपूरचा आहे. पण, मी तसे बोलणार नाही. कारण, ते माझे संस्कार नाही. पण, याचे उत्तर त्यांना जनता देईल. आपण 5 वर्ष गृहमंत्री राहिलो आहोत, आता पुन्हा आहे. मला याची जाणीव आहे की, मी पुन्हा गृहमंत्री झाल्यापासून अनेक लोक देव पाण्यात ठेऊन बसले आहेत, की मला गृहमंत्रीपद सोडावे लागेल. पण मी तुमच्या मेहनतीने नाही, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये गृहमंत्री आहे. जो-जो चुकीचे काम करेल, मी त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. राज्यात कुठेही कोणतीही अनुचित घटना घडली तर त्याची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल. पण, त्याआड राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य ठरणार नाही. चाणक्य एकदा असे म्हणाले होते की, राज्यातील चोर, डाकू, लुटेरु किंवा अपप्रवृतीचे लोक राजाविरुद्ध बोलतात, तेव्हा राजा योग्यप्रकारे कारभार करतो आहे. मी राजा नाही. पण, तरीही देखील चाणक्य जे म्हणाले तेच आता खरे होताना दिसते आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!