चवदार तळयाच्या दुरावस्थेकडे महाड नगरपालिकेचे दुर्लक्ष 

कोकण रिपब्लिकन संस्थेचे धरणे आंदोलन 

महाड (निलेश पवार) : महाड शहरातील चवदारतळे, छत्रपती शाहू महाराज सभागृह, स्वागत कमान आदी विषयावर वारंवार मागण्या करून देखील महाड नगर पालिका दुर्लक्ष करील असल्याच्या निषेधार्थ  बुधवारी कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली चवदारतळे येथे धरणे आंदोलन छेडण्यात आले.

महाड मधील चवदारतळे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांती करून या शहराचे नाव जागतिक पातळीवर नेले. मात्र या चवदारतळ्याकडे महाड नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. याकडे पालिका प्रशासनाकउे अनेकवेळा  मागण्या करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष  प्रकाश मोरे  यांनी केला. धरणे आंदोलनात महिला प्रदेश अध्यक्षा सुनीताताई गायकवाड, कोषाध्यक्षा बबनभाई राजापकार, उपाध्यक्ष संघराज तांबे, महाड तालुकाध्यक्ष बाळकृष्ण साळवी, सचिव दीपक महाडिक, शहर अध्यक्ष शेखर सावंत, आदी सहभागी झालेत.

यावेळी बोलताना प्रकाश मोरे  म्हणाले की, अनेक वर्ष आम्हाला गाव कुसाबाहेर ठेवले आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान देखील गावकुसाबाहेर उभी करण्याचा घाट महाड नगर पालिका घालीत आहे.  ज्या ठिकाणी किल्ले रायगडाकडे मार्ग जातो त्याच ठिकणी महाड शहर प्रवेशद्वाराजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वगत कमान उभी करावी अशी मागणी त्यांनी बोलताना केली. धरणे आंदोलनपुर्वी महाड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान नातेखिंड येथेच उभी करण्यात यावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची साफसफाई करावी, छ.शाहूमहाराज सभागृहाची नूतन वास्तू उभी करण्यात यावी, क्रांतिभूमी येथे प्रकाश योजना राबवावी, चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिन आणि मानुस्मृतीदिन यावेळी महाड नगर पालिकेने स्थानिक आंबेडकरी संस्था आणि संघटनांना बरोबर घेऊन संयुक्त समिती स्थापन करावी अशी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

2 Attachments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!