फेरीवाले हटले पण बेशिस्त रिक्षाचालकांना कोण आवरणार ?
घाटकोपरवासियांचा सवाल
घाटकोपर ( निलेश मोरे ) रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर झालेल्या कारवाईनंतर स्थानक परिसरातील रस्त्यांनी थेाडेदिवस का होईना मोकळा श्वास घेतला असला तरी बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतुक कोंडीत भर पडल्याने नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करा अशी मागणी घाटकोपरवासियांकडून होत आहे.
मुंबईत प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा संघटनांनी शेअर रिक्षाची स्वतंत्र रांग तयार करून थांबे सुरू केले आहेत. मीटर प्रमाणे भाडे घेणे हे रिक्षा चालकांना बंधनकारक आहे. मात्र अनेक रिक्षाचालक हे मीटरप्रमाणे भाडे नाकारतात. त्यामुळे रिक्षा चालक व प्रवाशांमध्ये हुज्जत होत असल्योच प्रकार नेहमीच घडत असतात. रिक्षा चालकांवर आरटीओ व वाहतूक पोलिसांचा अंकुश नसल्याने मनमानीपणे वागत असल्याच्या अनेक प्रवाशांच्या तक्रारी आहेत. एल्फिस्टन परेल दुर्घटने नंतर झालेल्या फेरीवाल्यांवरील कारवाई नंतर रस्ते मोकळे झाल्याचे चित्र सध्या तरी दृष्टीस पडत असले तरी हे चित्र किती दिवस राहते असाही प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. फेरीवाल्यांना हटवण्यासाठी पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कामाला लागले असले तरी रस्त्यावर बेशिस्तपणे रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने फेरीवाले हटवूनही तिच अवस्था पाहावयास मिळत आहे. रस्त्यात मध्य भागी या रिक्षा उभ्या राहत असल्याने प्रवाशी सुद्धा शेअर रिक्षा गाठण्यासाठी रस्त्यात मोठ्या रांगा लावून उभे राहतात त्यामुळे बेस्ट बसला तर त्याचा त्रास होतो, मात्र वाहन कोंडीमुळे हॉर्नच्या आवाजामुळे होणारा कर्ण कर्कश आवाज कानाच्या कानठळ्या बसवत असल्याने नागरिक खूपच त्रस्त आहेत . रस्त्याच्या मध्यभागी बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करणाऱ्या रिक्षा चालकांना देखील कारवाई व्हायला हवी असा तक्रारीचा सुरु प्रवाशांकडून व्हायला लागला आहे .
प्रवाशांचे काय म्हणणे..
न्यायालयाने फेरीवाल्याना जशी एक 150 मीटरची सीमारेषा आखून दिली आहे तशी शिस्तीची रेषा रिक्षा चालकांना देखील आखून दिली पाहिजे. त्यामुळे रिक्षाचालकांना शिस्त लागेल. बेशिस्तपणा करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा सुरु झाला पाहिजे . ( नितीन कामथे, प्रवाशी )
रिक्षा चालकांच्या संघटना व युनियन वाढत चालल्या आहेत. रिक्षा चालक मनमानीपणे वागतात. मनाला वाटेल तसे रस्त्यात रिक्षा उभ्या करीत असल्याने ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुले यांना कोंडीतूनच जावे लागत. बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. ( शरद कणसे, प्रवाशी )