मुंबई, दि. २४ : संरक्षण खात्याशी संबंधित राज्यातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत राज्यातील कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री यांची भेट घेऊन या प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधानपरिषदेत सदस्य उमा खपरे यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून म.वि.प. नियम ९२ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की, संरक्षण विभागाने अनेक ठिकाणी संरक्षित ना – विकास क्षेत्र (रेड झोन) जाहीर केले आहेत. त्यामुळे त्या भागातील विकास योजना राबविताना अडचणी जाणवतात. देहू रोड ( जि. पुणे) येथील दारूगोळा कारखान्याच्या या रेड झोन मुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे या विषयावरही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांच्याबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे लवकरच बैठक घेतील, अशी माहिती त्यांनी दिली. या चर्चेत सदस्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.