मुंबई, दि. २४ : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामासंदर्भात कारवाई करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येईल. सदर समितीमार्फत या विषयाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही 30 दिवसांच्या आत करण्यात येईल अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य गणपत गायकवाड यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी सदस्य प्रमोद पाटील, प्राजक्त तनपुरे यांनीही प्रश्न उपस्थित केले.
मंत्री सामंत म्हणाले की, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात २७ गावांतील २७ बांधकाम परवानगी पत्र तसेच डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागातील ३८ बांधकाम परवानगी पत्र असे एकूण ६५ 5 बांधकाम परवानगी पत्र बनावट असल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे. या सर्व परवानगी पत्रांची पडताळणी करण्यात आली असून सदर बांधकाम परवानगी पत्रे महापालिकेच्या नगररचना विभागाने दिलेली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये २७ बांधकाम परवानगीबाबत तर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये ३८ बांधकाम परवानगीबाबत परवानगी पत्रावरील नमूद विकासक आणि वास्तुविशारद यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या प्रकरणात पोलीस विभागामार्फत विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यामार्फत पुढील तपास सुरु आहे. याशिवाय ६५ प्रकरणातील प्रकल्प नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच रेरा कायद्याच्या तरतूदीनुसार संबंधित बँकांना सदर विकासाची बँक खाते गोठविण्याबाबत कळविण्यात आले आहे. आतापर्यंत १४ विकासकांना अटक आणि ४२ आरोपींवर दोषारोप ठेवण्यात आले आहेत.