मुंबई: राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन नेते आज एकत्र विधानभवनात आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर दुसरीकडे विधान परिषदेत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना परत येण्याची ऑफर्स दिल्याचा प्रसंग घडला.
मागील अडीच वर्षापासून राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना रंगला आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना या चित्रामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या दोन प्रसंगामुळे पुन्हा एकदा युतीची चर्चा रंगली.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही एंट्री झाली. राज्यातील सत्तातरानंतर प्रथमच ठाकरे फडणवीस समोरासमोर आल्याने दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. दोघेही हसत हसत विधानभवनात गेले. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व भाजपचे काही आमदारही उपस्थित होते. ठाकरे फडणवीस एकत्रित आल्याने सर्वांना धक्का बसला त्यामुळे युतीची चर्चा विधान भवन परिसरात रंगली होत. सकाळच्या सुमारास हा प्रसंग घडला असतानाच दुसरीकडे विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात मराठवाड्यातील वृक्ष लागवड योजनेची चौकशी करण्यासंदर्भात मंत्री सुधीर मुनगंटीवार उत्तर देत होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी वृक्ष लागवड केली, मात्र त्या वृक्षाला फळ आली नाहीत असे वक्तव्य केले. त्यावर मुनगंटीवार म्हणाले उद्धवजी झाडाला फळ येतील पण तुम्ही झाडाशी नातं तोडलं. आपल्याला झाड वाढवायचे आहे. त्याला खत द्यावे लागेल असं बोलत असतांना उद्धवजी पुन्हा कधी तरी शांततेने विचार करा असं मुनगंटीवार म्हणाले. या दोन्ही घटनांमुळे भाजप शिवसेना ठाकरे गट यांची पुन्हा युती होणार का ? अशीच चर्चा रंगली होती.