नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आठवडाभर सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमांची रेलचेल

डोंबिवली (प्रतिनिधी) : गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतयात्रेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या डोंबिवलीतील स्वागतयात्रेचे यंदाचे पंचविसावे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर सध्या जगभरात चर्चिल्या जाणाऱ्या भारताच्या वसुधैव कुटुंबकम्’ संकल्पनेचे प्रतिबिंब इथल्या स्वागतयात्रेत उमटणार आहे. यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजीत पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
गुढीपाडव्यानिमित्त १९९९ मध्ये ठाणे जिल्हा किंवा महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सर्वात पहिली स्वागतयात्रा काढण्याचा मान सांस्कृतिक नगरी डोंबिवलीने मिळवला आहे. आणि मग अल्पावधीतच डोंबिवलीच्या या स्वागतयात्रेचे अनुकरण ठाणे, मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरांनी करत या स्वागतयात्रेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताकडून राबविण्यात येणाऱ्या वसुधैव कुटुंबकम् संकल्पनेची जगभरात चर्चा आहे. आपल्या संस्कृतीमधील या अतिशय व्यापक संकल्पनेचे प्रतिबिंब यंदाच्या स्वागतयात्रेत दिसणार आहे. या संकल्पनेनुसार त्याविषयावरील विविध देखव्यांचे चित्ररथ, पंच महाभूतांची दिंडी आदींचा त्यात समावेश असल्याची माहिती संयोजन समिती सदस्य राजेंद्र हुंजे यांनी दिली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही होणार सहभागी…
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर निघणाऱ्या डोंबिवलीच्या स्वागत यात्रेमध्ये यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही सहभागी होणार असल्याची माहिती स्वागत यात्रेचे प्रमूख संयोजक दत्ताराम मोंडे यांनी दिली.

तरुणांसाठी रील आणि शॉर्ट फिल्म स्पर्धा…
श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामध्ये महिला, युवा आणि विद्यार्थी अशा तीन गटांसाठी विविध स्पर्धांचे घेण्यात येणार आहेत. ज्यातील सोशल मिडियातील यू ट्यूबसाठी रिल आणि शॉर्ट फिल्म स्पर्धा ही विशेष आकर्षण असल्याचे श्री गणेश मंदिर संस्थानचे कार्यवाह प्रविण दुधे यांनी सांगितले.

याशिवाय स्वागत यात्रेनिमित्त श्रीराम नाम जप यज्ञ, स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा, सामुदायिक गीता – गणपती अथर्वशीर्ष पठण, दिपोत्सव, बहुभाषिक भजन, पाककला स्पर्धा, सांस्कृतिक पथ, स्कूटर रॅली, गीत रामायण, महारांगोळी, श्री प्रभुरामांच्या जीवनावर आधारित नृत्यविष्कारासह छ्त्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त व्याख्यानाचेही यावेळी आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्ष अलका मुतालिक यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला संस्थानचे माजी अध्यक्ष राहूल दामले, सी ए सुहास आंबेकर, डॉ. उत्कर्ष भिंगारे, श्रीपाद कुलकर्णी, संयोजन समितीचे मिहिर देसाई, दिपाली काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

***

GS Brothers
*1 BHK अवघ्या 18 लाखात..टिटवाळ्यात स्वतःचे घर आजच बुकिंग करा. संपर्क : उमेश 7021610960 Jagdish – 8169906087*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!