डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका आणि एमआयडीसी प्रशासनाच्या कारभारावर येथील नागरिक नाराज आहेत. शहरामधील काही भागातील करदाते नगरीक आणि 27 गावातील नागरिक पाण्यासाठी मेटाकुटीला आले आहेत. असे असतांना पाणी चोरांचे फावले असून त्यांचा धंदा जोरात आहे. यावर अजब तऱ्हा म्हणजे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत धाड टाकून पाणी चोरांना पकडतात त्यांना पोलीस ठाणे दाखवतात. मात्र पालिका अधिकारी हे मान्य करीत नसून पाण्याची चोरी होत नाही असा दावा करीत आहेत. या प्रकारामुळे करदाते नागरिक संभ्रमात असून नक्की प्रकार काय अशी विचारणा होत आहे.
डोंबिवली शहराचा विचार केला तर पश्चिमकडील काही भागात पाणी टंचाईमुळे माणसे त्रस्त झाली आहेत. गणेशनगर, राजूनगर, कुंभारखानपाडा येथील नागरिक पाण्यासाठी पालिकेच्या दारात खेटे मारीत आहेत. पूर्वेकडे आजडेगांव, सांगाव, सांगर्ली आदी विभागातही तीच परिस्थिती आहे. मुख्य म्हणजे 27 गावातील भूमिपुत्रांना पाण्यासाठी वणवण होत आहे. तर भोपर गांवातील नागरिक पाण्यासाठी उपोषण करीत आहेत. भोपरगावात टोलेजंग इमारतींना तसेच संकुलाना अनधिकृत नळ जोडणी मोठया प्रमाणात असल्याने सामान्य नागरिकांना पाणी मिळत नाही ही खंत असून भोपरमधील नागरिक मानपाडा रस्त्यावर पाण्यासाठी उपोषण करीत आहेत.
सोमवारी रात्री उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाणी चोर टँकर माफियांवर धाडी टाकून काहींच्या विरोधात पोलीस कारवाई केली अशी माहिती समोर आली होती. मात्र मंगळवारी पालिका प्रशासनाने कोणीही पाणी चोर नसून बोरवेल माध्यमातून पाणी साठा करून व्यवसाय करतात असा खुलासा केला असल्याने नक्की प्रकार काय हे सामान्यांना कळून येत नाही. जर कोणी माफिया पाणी चोरून आपला व्यवसाय करीत नसतील तर ही बाब चांगली आहे. पण जर पाण्याची चोरी होत नाही मग कायद्याने मिळणारे पाणी करदात्या नागरिकांना मिळण्यास हरकत नाही पण तसेही होत नाही. यामुळे पालिका आणि एमआयडीसी प्रशासनानाबाबत प्रश्नचिन्ह उभे रहात आहे.
एकूण पाणी प्रश्नांबाबत एमआयडीसी कार्यकारी अभियंता सुधीर मागे यांनी सांगितले की, पालिका आणि एमआयडीसी प्रशासन एकत्रित चोरीच्या कनेक्शनबाबत पाहणी करणार आहेत. जर पाणी चोर सापडला तर तात्काळ पोलीस कारवाई करण्यात येईल. यापूर्वी वेगवेगळ्या कारवाई होत असल्याने एकमेकांकडे बोटे दाखवून पाणी चोर परिस्थितीचा फायदा घेत होते असेही निदर्शनास आले असल्याचेही त्यांनी सांगितले.