नागपूर : ‘इन्स्टाग्राम पेज’च्या माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढून परताव्याच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी नागपूर पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीतील 8 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 58 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. नागपुरातील दोन तरुणांची फसवणूक झाल्यानंतर या टोळीवर कारवाई करण्यात आली असून यामागे आंतरराज्यीय रॅकेटची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार साहील विनोदसिंह चव्हाण याचे ‘इन्स्टाग्राम’वर ‘विक्रांत एक्सचेंज’ नावाच्या पेजवर तीन दिवसांत तीन टक्के परताव्याची जाहिरात पाहिली. त्याने त्याचा मित्र शुभम काळबांडे यालादेखील यासंदर्भात माहिती दिली. दोघांनीही फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन स्वरुपात यात रक्कम गुंतविली. मात्र त्यानंतर साहीलला विक्रांत एक्सचेंजमधून एका व्यक्तीचा फोन आला व आणखी पैसे आमच्या खात्यात टाकले नाही तर तुमचे अगोदरचे सर्व पैसे बुडतील अशी धमकी देण्यात आली. दोघांनीही ऑनलाईन पैसे दिले तसेच रोहित पटेल नावाच्या व्यक्तीकडे रोख असे एकूण 10 लाख 90 हजार रुपये दिले. मात्र तरीदेखील आणखी पैसे द्या, अन्यथा पैसे बुडतील अशी धमकी देण्यात आली. अखेर साहीलने राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. शुभमसोबतदेखील असाच प्रकार होत होता. समोरील व्यक्ती फोनवरूनच सूचना देत होते. त्यानंतर 11 मार्च रोजी त्याने सांगितल्याप्रमाणे शुभम क्वेटा कॉलनी येथे पैसे घेऊन गेला. तेथे शहर पोलिसांचे एक पथकदेखील गुप्तपणे पोहोचले होते. अगोदर क्वेटा कॉलनीत विक्रांत एक्सचेंजचे दोन व्यक्ती आले व त्यानंतर आणखी एक व्यक्ती रक्कम घेण्यासाठी आला. तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले व गायत्रीनगर, क्वेटा कॉलनी येथे पोलीस पोहोचले. तेथे काही लोक रोख नोटा पैसे मोजण्याच्या मशीनवर मोजत होते. पोलिसांनी तेथून 58 लाख 36 हजार रुपये जप्त केले. याशिवाय पैसे मोजण्याच्या 2 मशीन व 6 मोबाईल जप्त करण्यात आले.

पोलिसांनी या प्रकरणात एकूण 9 आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला असून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. यात रोहीत पटेलसह अर्जुन चंदुभा राठोड ( गिरसोमनाथ, गुजरात), धर्मेंद्र अकोबा वाला ( गिरसोमनाथ, गुजरात), निलेशकुमार मनुप्रसाद दवे (पाटण, गुजरात), विष्णू क्रिष्णादास पटेल (पाटण, गुजरात), विरमसिंग जयवंतसिंग राठोड (सोमनाथ, गुजरात), विक्रमसिंह धनाजी वाघेला (पाटण, गुजरात), जोरुबा जेलुसी वाघेला ( पाटण, गुजरात) यांचा समोवश आहे. सर्व आरोपी बाहेरील राज्यातील असुन ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करून गुन्हा करीत होते. पैसे बुडतील अशी भिती घालून ते लोकांना ब्लॅकमेल करायचे व आणखी रक्कम घ्यायचे. पिडीत व्यक्तींकडून क्यूआर कोड किंवा ट्रान्सफरद्वारे येणारी रक्कम ही ‘मुरे गृहउद्योग’च्या नावे असलेल्या बॅंक खात्यात जमा व्हायची. संबंधित गृहउद्योगचा पत्ता जरीपटका येथील आहे. या गृहउद्योगाचा संचालक तसेच ‘विक्रांत एक्सचेंज’चे ‘इन्स्टाग्राम पेज’ चालविणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!