मुंबई : वांद्रे येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना नोटीस बजावण्यात आली. त्या बांधकामाचे पाडकाम केल्यानंतर ही भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद बोरीकर यांनी नोटीस बजावून अवमान केला. त्यामुळे आमदार परब यांनी या दोघांविरोधात आज विधान परिषदेत हक्कभंगाची सूचना मांडली. येत्या दोन दिवसांत यावर निर्णय घेणार असल्याचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्ट केले.
वांद्रे येथील म्हाडाच्या इमारतीतील सेनेचे कार्यालय म्हाडाने बेकायदेशीर ठरवले. आमदार अनिल परब यांना याप्रकरणी नोटीस देण्यात आली. किरीट सोमय्या यांनी हे कार्यालय अनिल परब यांचा असल्याचे सातत्याने आरोप केला. म्हाडाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नोटीस बजावली आणि प्रसार माध्यमातून नाहक बदनामी केली.
म्हाडाने मला नोटीस देण्यापूर्वी कागदपत्रांची तपासणी करायला हवी होती. परंतु तसे न करता, जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, केलेल्या तपासणीत हे कार्यालय माझे नसल्याचे समोर आले. म्हाडा प्राधिकरणाने पत्राद्वारे तसेच स्पष्टीकरण दिले आहे. माजी मंत्री, एक लोकप्रतिनिधी म्हणून जनमानसात माझी प्रतिमा मलीन करण्यात आली असल्याने किरीट सोमय्या आणि म्हाडा प्राधिकरणाचे उपाध्यक्ष मिलिंद बोरीकर यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना मांडत असल्याचे परब यांनी सांगितले. यापूर्वी ४ हक्कभंग दाखल झाले असून ही हक्कभंगाची पाचवी सूचना आहे.