Girish-Mahajan

केस पेपरसुद्धा मोफत असणार; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची जागतिक महिला दिनी घोषणा

मुंबई  :  देशात प्रत्येक वर्षी ९० हजार महिलांचा स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू होतो. दर सहा मिनिटाला एक मृत्यू असे या रोगाचे भयानक स्वरूप आहे. स्तन कर्करोगाबाबत जनजागृती अत्यंत महत्वाची असून राज्य शासन स्तनाच्या कर्करोगावरील सर्व उपचार मोफत करणार असल्याची घोषणा आज जागतिक महिला दिनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. यशिवाय कोणत्याही रूग्णालयात महिलांना स्तन कर्करोगाच्या तपासासाठी किंवा उपचारासाठी केस पेपर मोफत (फ्री) करणार असल्याचेही . महाजन यांनी सांगितले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कामा व आलब्लेस रूग्णालय येथे स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती आणि उपचार अभियानाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मंत्री महाजन बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले, जे.जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे आदी उपस्थित होते.

मंत्री. महाजन यांनी प्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. . महाजन यांनी सांगितले की, राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक बुधवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत स्तन कर्करोगाबाबत बाह्य रूग्ण विभाग (ओपीडी) सुरू करणार आहे. यामध्ये तपासणी, निदान आणि उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. देशात कर्करोगामध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. पूर्वी 60 ते 65 वयातील महिलांना स्तन कर्करोग होत असे, मात्र सध्या फास्टफूडच्या जमान्यात 25 ते 35 वयोगटातील महिला बळी पडत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा आजारही गंभीर असून यासाठी शहरांसोबत ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक आहे. महिलांचा जीव वाचावा, त्यांचे वेळेत निदान होवून त्वरित उपचार व्हावेत, यासाठी ही स्तन कर्करोग जागृती मोहीम हाती घेतली आहे. यासाठी आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महाविद्यालयीन मुली यांना प्रशिक्षण देवून त्यांच्यामार्फत ग्रामीण भागात जनजागृती केली जाणार आहे. महिला दवाखान्यात जाण्यास घाबरत असल्याने घरोघरी जावून त्यांची विचारपूस केली जाणार आहे.

स्तनाचा कर्करोग हा चार स्तरावर होतो. पहिल्या दोन स्तरावर कर्करोगाचे निदान झाल्यास उपचार करणे रूग्णावर सोपे जाते, रूग्ण वाचू शकतो. तिसऱ्या, चौथ्या स्तरावर स्तन कर्करोगाचे निदान झाल्यास सर्जरी, केमो थेरपी, रेडिएशन यानंतरही रूग्ण वाचण्याचे प्रमाण कमी आहे. आपण स्वत:ही तपासणी करू शकतो. यामुळे महिला, मुली यांनी न घाबरता स्तनाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. हा रोग समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

प्रारंभी मंत्री महाजन यांच्या हस्ते कामा व आलब्लेस रूग्णालयात अत्याधुनिक आयव्हीएफ आणि युरो गायनॉकॉलॉजी सेंटरचे भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर बालरोग विभागाचे उद्घाटन आणि पाहणी करण्यात आली. स्तन कर्करोगाचे निदान त्वरित होण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या स्तनाचा कर्करोग निदान केंद्राचे उद्घाटनही मंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!