पुण्यातील भोसरी परिसरात अज्ञातांनी तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली असून गेल्या २४ तासातील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
पुणे- पुण्यातील भोसरी परिसरात अज्ञातांनी तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासातील गोळीबाराची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
विजय पांडुरंग घोलप (३४) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. भोसरीमधील गवळीमाथा चौकात शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
विजय घोलपचे गवळीमाथा येथे जय महाराष्ट्र या नावाने स्नॅक्स सेंटर आहे. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास तो स्नॅक्स सेंटरचे शटर उघडत होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून हेल्मेट घालून आलेल्या अज्ञात आरोपींनी विजयवर पाच गोळ्या झाडल्या. या गोळ्या विजयच्या दंडावर, हातावर, कमरेवर लागल्या आहेत. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी चिंचवड येथील निरामय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गोळीबाराचे नेमके कारण अद्यापर्यंत समजू शकले नाही. भोसरी, एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या २४ तासातील ही सलग दुसरी घटना आहे. शुक्रवारी पिंपरीतील साधू वासवानी उद्यानाजवळील एका हॉटेलमध्ये दिवसाढवळ्या संतोष कुरावत या सराईत गुन्हेगारावर धारदार शस्त्राने हल्ला करून गोळीबार करण्यात आला होता. शहरात लागोपाठ घडलेल्या दोन गोळीबारांच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.