मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. ०५ -: सदगुरू परिवाराच्या साक्षीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान करण्यात आला. नानासाहेब आणि अप्पासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम ते करत आहेत. सचिनदादांना डिलिट या पदवीने सन्मानित करणे म्हणजे सद्गगुरू परिवाराच्या प्रत्येक सदस्याचा सन्मान आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. जगात अनेक विद्यापीठे असली तरी माणूस घडविणारे खरे विद्यापीठ हे रेवदांड्याला असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठच्या वतीने सद्गुरू परिवाराचे सचिनदादा धर्माधिकारी यांना त्यांच्या निस्वार्थी समाज कार्याबद्दल आज मानद डॉक्टरेट पदवीने (डिलिट) सन्मानित करण्यात आले. वाशीतील सिडको एक्झीबीशन सेंटर येथे आयोजित दीक्षांत सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठचे अध्यक्ष डॉ. विनोद टीबरेवाला, डॉ. सचिनदादा धर्माधिकारी, सौ. स्वरुपा सचिनदादा धर्माधिकारी, केंद्रीय मंत्री पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार पूनम महाजन, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नवीमुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, विशाल टीबरेवाला, उमा विशाल टीबरेवाला, श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठाचे सर्व विश्वस्त तसेच मुंबई आणि कोकणाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आलेले सद्गुरु परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपण सर्व भाग्यवान आहोत. कारण आपल्याला नानासाहेब आणि अप्पासाहेबांसारख्या महान व्यक्तींचा सहवास मिळाला. मी देखील आपल्याच परिवाराचा सदस्य आहे. मला योग्य मार्गदर्शन, प्रेरणा आणि सतत काम करण्याची उर्जा अप्पासाहेबांकडून मिळते. माझा मानसिक ताणतणाव वाढतो त्यावेळी मी देखील बैठकीस जातो. बैठकीतून समाधान प्राप्त होते. ज्यांच्यावर संकटं येतात, दु:ख येतात त्यांना दिशा आणि मार्गदर्शन देण्याचे काम अप्पासाहेबांनी केले आहे.

धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात सामाजिक कामे केली जातात. ज्याठिकाणी शासन पोहचत नाही त्याठिकाणी प्रतिष्ठानाचे सदस्य पोहोचतात. श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठाने सचिनदादांच्या समाज कार्याची दखल घेऊन खऱ्या व्यक्तीमत्वाला पदवी बहाल केली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले की, साधूसंतांचे विचार मिळाले की, मानवी जीवन समाधानी होते. बैठकीत जाणाऱ्यांना काय मिळते, तर मानसिक समाधान मिळते. समाजाला प्रबोधनाची आवश्यकता आहे. अंत:करणाची स्वच्छता केल्याशिवाय समाजाची, परिसराची आणि निसर्गाची स्वच्छता करता येणार नाही. मानवता धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे. दिवसभरात आपण समाजासाठी काय केले याचे रोज आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.

GS Brothers
1 BHK अवघ्या 18 लाखात..टिटवाळ्यात स्वतःचे घर आजच बुकिंग करा. संपर्क : उमेश 7021610960 Jagdish – 8169906087

केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले की, आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा दिवस आहे. डिलिट हा पदवी प्रदानाचा असा कार्यक्रम जगाच्या पाठीवर एवढया मोठया अथांग जनसागरा समोर पहिल्यांदाच होतो आहे. सचिनदादांना डॉक्टरेट ही पदवी दिल्यानंतर त्या पदवीचा मान वाढला आहे. आपल्या विचारांनी आणि प्रेरणांनी जमवलेली माणसे हीच खरी संपत्ती असते, त्यामुळे अप्पासाहेबांसारखा श्रीमंत जगात कोणी नाही. आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी अप्पासाहेबांचे आशिर्वाद मिळाले ही माझ्यासाठी माझ्या वाढदिवसाची अमूल्य भेट आहे.

यावेळी डिलीट पदवी दिल्याबद्दल श्री सचिन धर्माधिकारी यांनी आभार व्यक्त करून नानासाहेब धर्माधिकारी व आप्पासाहेब धर्माधिकारी हे खरे विद्यापीठ असून त्यांचा सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्यासाठी अश्या सन्मानामुळे आणखी प्रेरणा मिळाली असल्याची भावना व्यक्त केली. सचिन यांच्या पत्नी श्रीमती स्वरूपा यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने सद्गुरू परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *