आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत केली हेाती मागणी
मुंबई : राज्यात सरकारी सेवेसाठीच्या ७५ हजार जागांच्या भरतीसाठीची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही वयोमर्यादा वाढवण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत केली होती. याची दखल घेत राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयामुळे आमदार सत्यजीत तांबे यांच्या मागणीला अखेर यश आले आहे.
कोरोना नंतरच्या शासकीय भरतीसाठी राजस्थानने ४ वर्ष, मध्यप्रदेश व ओडिशाने ३ वर्ष, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, नागालँड व त्रिपुरा या राज्यांनी २ वर्षांची वयोमर्यादा वाढविली आहे. म्हणून राज्य सरकारनेदेखील वयोमर्यादा वाढवावी अशी विनंती आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत केली होती.
सरकारच्या विविध विभागात सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दोन वर्ष वाढवून देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याचं परिपत्रक जारी केले असून, या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गाची कमाल वयोमर्यादा यामुळे ३८ वरून ४० तर मागास प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ४३ ऐवजी ४५ वर्षे इतकी होईल. यामुळे राज्यातील हजारो बेरोजगारांना दिलासा मिळाला आहे.
राज्यभरात मागील दोन वर्षांच्या कोविड काळात सरकारी नोकरभरती ठप्प होती. त्यामुळे नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हता. यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.