जळगाव, 3 मार्च – जिल्ह्यात गुटखा विक्री व वाहतुकीविरुध्द अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाने मोहिम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांचे पथकाने मुक्ताईनगर ते बुराहनपुर रोडवरील कामखेडा गावाच्यापुढे सापळा रचलेला होता. त्यासुमारास संशयित वाहन महेंद्रा पिकअप बोलेरो क्र.MH-१९-CY-४७९२ हे अतिवेगाने येत असताना पथकाने ते वाहन थांबवून तपासणी केली.
त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये उत्पादन, साठा वितरण, विक्री व वाहतूकीकरीता प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू या अन्न पदार्थाचा साठा आढळून आला आहे. त्यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे आणून एकुण २५ लाख १२ हजार ९८० रुपयांचा साठा जप्त केला आहे. तर वाहनचालक, वाहनमालक व साठामालक यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री. रा. मा. भरकड यांनी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहायक आयुक्त संतोष कृ. कांबळे, सह आयुक्त, (नाशिक विभाग) गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. या गुन्ह्यामधील मुख्य सुत्रधाराचा शोध घेतला जात असून जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने गुटखा विक्रेत्यांविरुध्द तीव्र कारवाई करणार असल्याचे संतोष कृ. कांबळे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.