अंगारकी चतुर्थीनिमित्त सिध्दिविनायक मंदीरात भाविकांची रिघ
मुंबई : अंगारकी चतुथीनिमित्त मुंबईतील सिध्दिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रिघ लागलीय. त्यामुळे दादरमधील प्रभादेवी परिसर भाविकांनी फुलून गेलाय.
बिग बी अमिताभ बच्चन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्यासह अनेक सेलिब्रेटी, विविध क्षेत्रातील नामवंत आणि दिग्गज मंडळी, सर्वच जाती धर्मातले भाविक ज्या ठिकाणी डोके टेकवून मनोभावे गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येतात, ते मुंबईतील प्रसिध्द गणेश मंदिर म्हणजे प्रभादेवी येथील श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर ! येथे दररोज लाखो भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली असते. देशातील नव्हे तर जगभरातील भाविकांसाठी हे श्रध्देचे स्थान बनलयं. सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून भक्त मुंबईत येतात. विशेषतः दर मंगळवार, संकष्टी, अंगारकी चतुर्थी, माघी गणपती, गणेशोत्सव या काळात भक्तांची रीघ लागते. आज अंगारकी चतुर्थीनिमित्त बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. मुंबईसह उपनगरातून लाखो भाविक आले आहेत. अंगारकी निमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. प्रचंड गर्दीमुळे काही भाविक मुख दर्शन घेऊन किंवा कळस दर्शन घेऊन समाधान मानत आहेत. गणेशाच्या दर्शनासाठी दररोज ५० हजार भाविक येत असतात. शनिवार व रविवारी दीड लाख तर मंगळवारी दोन लाख भाविक येतात. अंगारकी , संकष्टीच्या दिवशी १८ ते २० लाख भाविक भेट देतात. दर्शनासाठी येणारे बालक,वृध्द,आजारी अथवा अपंगासाठी स्वतंत्र रांगेची सोय आहे. मंदिराच्या आवारात एकूण १३० सीसी टिव्ही कॅमेरे आहेत. तसेच २ कंट्रोल रूम असून, ते २४ तास सुरू असतात. मंदिराच्या दोन गेटला ४ मेटल डिटेक्टर, २ स्कॅनर मशीन, हॅन्ड डिटेक्टर, एक पोलीस चौकी आहे.
मंदिराचा इतिहास
श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर हे पुरातन मंदिर असून, कार्तिक शुध्द चतुर्दशी शालिवाहन शके १७२३ (सन १८०१) रोजी त्याचा पहिला जीणोद्वार, नुतनीकरण विधिपूर्वक करण्यात आल्याची माहिती मिळते. हे मंदिर साधारण दोनशे वर्षाहून अधिक पुरातन असल्याचे दिसून येते. श्री सिध्दिविनायकाची मुर्ती ही काळया पाषाणाची असून, बैठकीपासून किरीटापर्यंत अडीच फूट उंचीची व दोन फूट रूंदीची आहे. मूर्ती उजव्या सोंडेची असून, तिच्या वरच्या उजव्या हातात कमळ तर डाव्या हातात परशू, खालील उजव्या हातात जपमाळ तर डाव्या हातात मोदकाची वाटी आहे. श्रीच्या गळयात सर्पाकृती यज्ञोपवीत (जानवे) आहे. पाषाणाच्या मखरात कोरलेल्या श्री सिध्दीविनायकाच्या बाजूला रिध्दी व सिध्दी या ऐश्वर्य भरभराट सुख समृध्दी व मांगल्य यांच्या देवता उभ्या आहेत. ही मुर्ती महादेव शंभोप्रमाणे त्रिनेत्रधारी आहे. श्री सिध्दी विनायक गणपती मंदिर न्यास शासनाच्या अंतर्गत काम करते. न्यासाकडून शैक्षणिक आणि वैद्यकीयसह विविध समाजपयोगी कामे केली जातात. भक्तांचा पैसा समाजासाठी वापरायचा हेच न्यासाचे ध्येय असल्याने, मंदिराला मिळालेली मदत समाजसेवेसाठी वापरली जाते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!