अंबरनाथमध्ये मृत तरुणाला जिवंत करण्याचा प्रकार उघड; दहा दिवस सुरु होती प्रार्थना 

पोलिसांनी हस्तक्षेप करताच मृतदेह मुंबईतील घरी नेण्यात आला

अंबरनाथ : अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या एका चर्चमध्ये  मृत व्यक्तीचा मृतदेह ठेऊन त्याला प्रार्थनेद्वारा जिवंत करण्याचा अघोरी प्रकार  उघडकीस आलाय. मुंबईतून हा मृतदेह अंबरनाथमध्ये आणण्यात आला होता. रात्री उशिरा पोलीसांना या गोष्टीची कल्पना झाल्यावर पोलीसांनी त्या तरुणाच्या कुटुंबियांची समजुत काढत त्यांना अत्यंसंस्कार करण्यास सांगितले. अखेर या कुटुंबियांनी पुन्हा हा मृतदेह मुंबईला चिंचपोकळी येथील त्यांच्या घरी नेण्यात आलाय. या प्रकारामुळे अंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे.

मुंबईच्या चिंचपोकळी येथे राहणारा मिशाख नेव्हीस् या तरुणाचा कर्करोगाने 27 ऑक्टोंबरला मृत्यू झाला होता. त्याचे वडील हे मुंबईच्या नागपाडा येथील जीजस फॉर ऑल नेशनस् चर्चचे बिशप आहेत. आपल्या तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने वडीलांनी त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न सुरु केला. नागपाडा येथील चर्चमध्ये मिशाख याला 27 ऑक्टोंबर रोजी ठेवण्यात आले. चर्चमध्ये प्रार्थना केल्यावर जिजस त्याच्यामध्ये पुन्हा प्राण टाकेल अशी अंधश्रध्दा त्यांची होती. 9 दिवस चर्चमध्ये ठेवल्यावर त्याची चर्चा नागपाडा भागात झाल्यावर पोलीसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. या तरुणावर अंत्यसंस्कार करण्याच्या सुचना दिल्या. मात्र मिशाख यांच्या कुटुंबियांनी प्रार्थना सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. नागपाडा येथे चर्चा झाल्याने त्यांनी हा मृतदेह थेट अंबरनाथ येथील जीजस फॉर ऑल नेशनस् चर्चमध्ये आणले. 5 नोव्हेंबरला पहाटे 5 वाजता पुन्हा अंबरनाथच्या चर्चेमध्ये प्रार्थना सुरु करण्यात आली. दिवसभर या तरुणाला जिवंत करण्याचे प्रयत्न बिशप यांनी केले. त्याच्यासोबत त्या मुलाचे कुटुंबिय देखील होते. रात्री उशिरा या प्रकाराची माहिती पोलीसांना मिळताच अंबरनाथ येथील  पोलीसांनी जीजस फॉर ऑल नेशनस् चर्चमध्ये प्रवेश करत  त्यात हस्तक्षेप करुन त्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला पोलीसांनी दिला. मिशाख या तरुणाला अंबरनाथच्या चर्चेमध्ये आणल्याची माहिती नागपाडा पोलीसांना देखील देण्यात आली आहे. त्यामुळे या तरुणाच्या बाबतीत त्याचे कुटुंबिय काय निर्णय घेतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अंबरनाथहुन हा मृतदेह चिंचपोकळी येथे त्याच्या राहत्या घरी नेण्यात आला आहे. अंबरनाथच्या येथील या प्रकरणात कायद्याची बाजू तपासून संबंधित पोलीस स्टेशनला अहवाल पाठवण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

“मिशाख या तरुणाला अंबरनाथच्या ज्या चर्चमध्ये आणण्यात आले होते ते चर्च अंबरनाथच्या नारायण चित्रपटगृहात सुरु करण्यात  आले आहे. या प्रकारामुळे आता चर्चच्या अडचणीत वाढ झालेली असुन अंधश्रध्दा प्रकरणात चर्चवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणात नागपाडा पोलीसांसोबत चर्चा करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहे.  ( सुनील पाटील, एसीपी अंबरनाथ )

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *