वाळण कोंडीवरील झुलत्या पुलाची दुरावस्था : पर्यटकांची पावलेही दबकतच
महाड(निलेश पवार) : महाड तालुक्यातील वाळण कोंड येथील झुलता पूलाची अनेक वर्षांपासून दुरुस्ती न केल्याने हा पूलाची दुरावस्था झालीय. पुलाच्या अनेक जागी तारा तुटल्या आहेत. तर अनेक ठिकाणी गंजून गेल्या आहेत. त्यामुळे पर्यटक व भाविक या पुलावरून चालताना दबकतच पावले टाकतात. इथल्या मंदिरात नवस फेडण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील पुढारी आणि लोकप्रतिनिधी याठिकाणी येतात पण त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने वाळण येथे साधारण २४-२५ वर्षापूर्वी याठिकाणी एक पूल बांधण्यात आला. दोन्ही बाजूला भले मोठे पिलर आणि झुलता प्रकारातील हा पूल तयार करण्यात आला. डोहातील पाणी न्याहाळतच प्रवासी पूल पार करत असतात. पुलाच्या डागडुज्जीकडे कानाडोळा केल्याने हा पूलाची दुरावस्था झालीय. पुलाच्या तारा तुटून गेल्या असून गंजल्या आहे. पुलाची दुरूस्ती करावी यासाठी अनेक तक्रारी करण्यात आल्या मात्र लोक्रप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणांनी याकडं दुर्लक्ष केलय असे स्थानिक गावक-यांनी सांगितले. महाडसह अनेक ठिकाणचे लोकप्रतिनिधी निवडणुकीपूर्वी आपला विजय व्हावा म्हणून नवस बोलण्यासाठी इथल्या मंदिरात येत असतात. पुलाच्या दुरूस्तीसाठी त्यांच्याकडे अनेकवेळा विनंती करण्यात आली. पण एकदा निवडणूक झाली इकडे कोणीही फिरकत नाही. अगदी नवस फेडायला देखील विसरून जातात अशी माहिती वजा नाराजी रेनोसे मंदिर पुजा-यांनी व्यक्त केली.
वाळणचे पर्यटकांना आकर्षण
वाळण हे स्थळ महाडपासून सुमारे २० किलोमीटरवर आहे. वाळण गावाशेजारून काळ नदी वाहते. या परिसरात नदीचे पात्र अरुंद असून, तीव्र उतार आहे. डोंगरदऱ्यांतून वाहत येणाऱ्या नदीचा पावसाळ्यातील रौद्र रूप भयाण असते. नदीचे पाणी एका जागी पडून वाळण येथे मोठा डोह तयार झालाय. या डोहातील मासे हे सुध्दा इथले आकर्षणच ठरले आहेत. माशांबाबत धार्मिक आख्यायिका सांगितली जाते त्यामुळे या माशांना देवाचे मासे असेही ओळखले जाते. वाळण कोंडीत असलेले पाणी कधीच आटत नाही शिवाय येथे असलेले मासे हे वेगळ्या जातीचे आणि प्रत्येक क्षणाला मोठे मासे पाहण्याची संधी भाविकांना मिळते. अशा या कोंडीच्या बाजूला ग्रामस्थांच्या वरदायिनी देवीचे स्थान आहे. भाविक या देवीचे दर्शन आणि मासे पाहण्यासाठी याठिकाणी येतात.