अखेर भगतसिहं कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर : विरोधकांकडून स्वागत
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे. १९७८ सालापासून रमेश बैस नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांनी तीव्र विरोध झाला होता. महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढून टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही, असं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या महापुरूषांबाबत देखील कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. कोश्यारी यांच्या विषयी महाराष्ट्रात विरोध वाढत असल्याने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल
रमेश बैस हे महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत. रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला. १९७८ सालापासून रमेश बैस यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली १९७८ ते १९८३ पर्यंत ते रायपूरमधून नगरसेवक राहिले हेाते. १९८० ते ८४ मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते. १९८९ साली ते रायपूर मतदार संघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले. त्यांनतर १९९६, १९९८ साली पून्हा रायपूरमधून खासदार झाले. १९९९ साली बैस चौथ्यांदा खासदार बनले. छत्तीसगढ राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा ते खासदार होते. रमेश बैस यांनी केंद्रातही राज्यमंत्रीपद भूषवले आहे. रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. आता त्यांच्याकडे महाराष्ट्राचं राज्यपालपदाची धुरा असणार आहे.
विरोधकांकडून निर्णयाचे स्वागत ..
काही दिवसांनी महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यपाल अभिभाषण करत असतात. यावेळी विरोधकांकडून राज्यपालांचा विरोध होण्याची दाट शक्यता होती. नुकतेच दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे कोल्हापूरमधील नेते संजय पवार यांनी राज्यपालांविरोधात आक्रमक आंदोलन केले होते. मविआचे नेते सतत राज्यपाल हटाव मोहीम राबवत होते. त्यासाठी ते आग्रही होते. अखेर राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर विरोधकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.