मुंबई मराठी पत्रकार संघाकडून सूरमयी भावांजली !

मुंबई :  आवाज़ देके हमें तुम बुलाओ,  कुहू कुहू बोले कोयलिया,   मेरी वीणा तुम बिन रोये, एक शहंशाह ने बनवा के हंसी ताजमहल,  अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम,  अशी लतादिदींची अजरामर गीतांना उजाळा देत सोमवारची संध्याकाळ रसिकांसाठी संगीतपर्वणी ठरलीच. निमित्त होतं, भारतरत्न  लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे !  मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ‘रागदारी स्वरलतेची’ या आगळ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संगीतमय कार्यक्रमातून लतादिदिंना सूरमयी श्रध्दांजली वाहण्यात आली. 

 ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत समीक्षक पं. अमरेंद्र धनेश्वर यांनी लतादिदींच्या अजरामर चित्रपट गीतांमधील रागदारीच्या प्रात्यक्षिकांसह ही गीते सादर केली. यावेळी मुंबई  पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते  पं. अमरेंद्र धनेश्वर आणि सहकलाकारांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे,  माजी अध्यक्ष अजय वैद्य आदी उपस्थित होते. पंडीतजींनी सादर केलेले  जय शंकरा गौरी.. या गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर १९५७ सालातील देख कबीरा रोये या चित्रपटातील मेरी वीणा तुम बिन रोये, सजना .. हे लतादीदींच्या आवाजातील गीत ऐकविण्यात आले. या चित्रपटातील सलग तीन गाणी ही वेगवेगळया रागांवर गाण्यात गायली आहेत. कोई पास आया सवेरे सवेरे … हि  जगजीत सिंह यांची गझलही पंडीतजींनी सादर केली. या गझलीत ललित रागाचा वापर कशाप्रकारे करण्यात आला याचाही उलगडा त्यांनी केला.  एक शहंशाह ने बनवा के हंसी ताजमहल…, सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है …हे युगल गीत तर १९६१ च्या चित्रपटातील   अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम  या  गीताची ध्वनीफित ऐकविण्यात आली. लतादिदींच्या गीताने रसिक तल्लीन झाले होते. ओ चांद जहां वो आए .. हे गाणं संपूर्णपणे ऐकवण्यात आले, यावेळी रसिकांनी टाळयांच्या गजरात दाद दिली.  

ममता चित्रपटातील छुपा लो यु दिल मे प्यार मेरा हे गीत,  प्रोफेसर चित्रपटातील  आवाज दे के हमे तूम बुलाओ, तर सुवर्ण सुंदरी या चित्रपटातील कुहू कुहू बोले कोयलिया..  या  गाण्यांनी ६० च्या दशकाची आठवण करून दिली.  लतादिदींच्या आवाजातील एकापेक्षा एक अजरामर गीत ध्वनीफितीच्या माध्यमातून रसिकांना ऐकविण्यात आली. पं. अमरेंद्र धनेश्वर यांनी  लतादिदींच्या   गीतांमधील रागदारी, गीतांची पार्श्वभूमी, इतिहास आदींबाबतही रंजक माहिती यावेळी देण्यात आली. अनेक रसिकांनी ही माहिती लिहूनही ठेवली.  एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे .. हे  पंडीतजींनी गायलेल्या गाण्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. कशी रे तुला भेटू मला वाटे लाज… या पंडीतजींच्या  गाण्याने रसिकांची दाद मिळवली. यावेळी तबल्यावर मुक्ता रास्ते, सारंगी वादन संदीप मिश्रा आणि तानुपरावर गौरांग तेलंग यांची साथसंगत लाभली. निवेदक पद्मजा दिघे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर राजेंद्र हुंजे यांनी आभार मानले. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अजय वैद्य यांच्या संयोजनातून  साकारलेला हा कार्यक्रम म्हणजे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना पत्रकार संघाने वाहिलेली भावांजली ठरली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!