२६ जुलै १९९९ चा तो दिवस भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. या दिवशी भारताने जगातील सर्वात कठीण युद्धांपैकी एक म्हणजे कारगीर युद्ध जिंकले. १९९९ मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. आज कारगिल युद्धाची आठवण होण्याचे कारण म्हणजे, कारगील योध्दे, भारतीय सैन्य दलातील निवृत्त अधिकारी कॅप्टन बबनराव गायकवाड यांचे २५ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आपल्या प्राणाची बाजी लावून कॅप्टन गायकवाड युध्दात लढले होते. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मानही करण्यात आला होता. त्यानिमित्ताने कॅ बबनराव गायकवाड यांच्या आठवणींना दिलेला उजाळा …

सैनिक म्हटले की प्रत्येकालाच विशेष आकर्षण व कौतुक राहिले आहे. त्यांची कर्तव्यावरील निष्ठा व समर्पण आपल्याला सुरक्षित आयुष्य देत असते. पहिल्याच भेटीत मलाही त्यांच्याविषयी आकर्षण आणि आदर निर्माण झाला. आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार विनोद साळवी यांच्यामुळेच कॅ बबनराव गायकवाड यांच्याशी परिचय झाला. बबनराव गायकवाड हे विनोद साळवी यांचे सासरे ! पण विनोद ही त्यांना वडीलांप्रमाने आदर देत तर ते ही मुलाप्रमाणे प्रेम करीत. इतकं जावई सासऱ्याच प्रेम जवळून पाहिले. बबनराव गायकवाड कडक शिस्तीचे होते, पण अतिशय प्रेमळ स्वभावाचे होते. महाड येथे अनेकवेळा त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा, त्यांच्याशी चर्चा करण्याचा योग आला. कारगील युध्दाचा प्रसंग, आठवणी सांगताना त्यांच्यातील देशभक्ती रोमारोमातून दिसून यायची. त्या आठवणीत ते गढून जात. त्या आठवणी सांगताना, कारगीलचा प्रसंग डोळयादेखत होत आहे असाच भास होत. त्यांना वाचनाची गोडी असल्याने शब्दांवर त्यांच प्रभुत्व होतं. सैन्यदलातील शिस्त, दिनक्रम अशा अनेक गोष्टी ते सांगत असत. सैनिक कर्तव्यात असो किंवा सुट्टीवर असो, नेहमीच आपल्या शिस्तीत रहातो. लोकांनी सैनिकांना आदर दिला पाहिजे कारण ते जे काही करतात ते आपल्या सुरक्षेसाठी करतात असे ते नेहमी सांगत असत.

महाडमधील आसनपोई गावचे सुपुत्र असलेले कॅ बबनराव गायकवाड यांना लहानपणापासूनच देशसेवेचे वेड असल्याने, त्यांच्या नसानसात देशसेवा भिनली होती. लहान असतानाच माता-पित्याचे छत्र हरपल्यानंतर बबनराव यांनी वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय लष्करात प्रवेश घेतला. तब्बल ३२ वर्षे त्यांनी लष्कराची सेवा करून, देशसेवेसाठी योगदान दिले. अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी एक सैनिक ते अधिकारी पदापर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. कविता आणि गाणं हा त्यांचा आवडता छंद ! शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर ठासून भरला होता. त्यांच्या कविता शायरीतून ते प्रकर्षाने दिसून येत. नाशिक येथील मिलिंद संस्थेच्या लोकरंजन कला मंडळाचा महाकवी वामनदादा कडक राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

फेटा कफनाचा बांधून शिराला… कायदा भीमाचा बहुजन हिताचा… आखरी क्षण हा जीवनाचा… गुणाची ज्यांच्या गौरव गाथा… कुर्बानिची किंमत कळणार तुम्हा नाही… शुभ्र वस्त्रांना पहाटेच्या परी… जिंकली लढाई त्या ५०० महारानी.. कशी नशिबाची संपली सिमा.. दिनानाथ तू तारीलेस …अशी अनेक भीमगीत, बुध्दगीत लोकगीत, गझल, कव्वाली त्याच्या लेखणीतून साकारली आहे.

बहादूर सैनिकाचे, बहादूर कुटूंब …

एक बहादूर सैनिक म्हणून बबनराव यांची ख्याती होतीच. परंतु त्यांच्या पत्नी सुनीताताई गायकवाड यांनीही सामाजिक कार्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आसनपोई गावचे सरपंच पदही सुनीताताईंनी भूषवले आहे. महिलांवरील अन्याय अत्याचार असो वा सामाजिक समस्या असो अडले नडलेल्यांच्या सुनीताताई आधार बनल्या आहेत. पती बॉर्डरवर लढत असतानाच सुनीताताईनी कुटूंब सांभाळलं. चारही मुलींना शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं केले. आई वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवीत, त्यांची कन्या प्रतीक्षा हिने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग खेळातून सोनेरी कामगिरी करीत देशाचे नाव उंचावले आहे. त्यांची एक कन्या सृष्टी या मुंबईत परिचारीका आहेत. श्रेया आणि नितिशा या दोन मुली स्वत:चा व्यवसाय करीत आहेत. बहादूर सैनिकाचे हे बहादूर कुटूंब ओळखलं जातय.

कॅ बबनराव हे अतिश्य बोलके, मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे होते. कोणताही विषय असो ते आपली मतं परखडपणे मांडत. कवी मनाचे असलेले बबनराव यांनी सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर कविता आणि गाण्याचा छंद जोपासला. कारगील युध्दातील एक अधिकारी म्हणून त्यांचा सन्मान व्हायचाच, परंतु महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर म्हणून बबनरावांनी नवी ओळख मिळवली होती. पहाडी आवाजाची त्यांना निसर्गदत्त देणगी होती. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत, ह्दयाला स्पर्श करणारी होती. राज्यभर त्यांच्या शाहिरी, कव्वालीचे अनेक कार्यक्रम होत असत. महाडपासून ते थेट मुंबई, डोंबिवली, कल्याणपर्यंत त्यांच्या कार्यक्रमांना मागणी वाढत चालली होती. आज कॅ. बबनराव गायकवाड हे आपल्यात नसले तरी सुध्दा कारगील योध्याचा लाभलेला स्नेह, त्यांची देशसेवा आणि, भारदस्त आवाज सदैव स्मरणात राहिल. त्यांच्या देशसेवेला आणि शाहिरीला सलाम !

: – संतोष गायकवाड, डोंबिवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *