तुडीलमधील नवनिर्वाचित सरपंचाच्या घरावर हल्ला
महाड – महाड तालुक्यातील तुडील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून निवडून आलेले इनायतुल्ला अलीखान देशमुख यांच्या घरावर शनिवारी रात्री कांही अज्ञात व्यक्तीने हल्ला करण्याची घटना घडली आहे. घराच्या काचा या अज्ञात इसमांनी फोडल्या आहेत. याबाबत सरपंच देशमुख यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महाड तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. या निवडणुकीत तुडील गावातील इनायतुल्ला अलीखान देशमुख हे निवडून आले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास देशमुख कुटुंब झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने घराच्या समोरील खिडकीवर दगडी मारल्या. यामध्ये या खिडक्या फुटल्या गेल्या आहेत. यावेळी देशमुख यांची पत्नी, तीन सुना, तीन नातवंड झोपलेले होते. कांही दिवसापूर्वी या निवडणूकिवरून जमीर फैरोजखान देशमुख आणि इनायतुल्ला अलीखान देशमुख यांच्यात वाद झाला होता. या वादातूनच हा हल्ला झाला असण्याची शक्यता इनायतुल्ला अलीखान देशमुख यांनी वर्तवली आहे.
याबाबत इनायतुल्ला अलीखान देशमुख यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानुसार भाद्वी कलम ४२७/ ५०६ नुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.