ठाणे : जिल्हाधिकारी यांच्या दालनात एक आगळावेगळा अनौपचारिक असा सोहळा पार पडला… जिल्ह्यातील 16 बालकांना आज एकाच वेळी कायदेशीररित्या पालक मिळाले. दत्तक आदेश घेताना पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता.. तर ही प्रक्रिया पार पडताना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हेही भावुक झाले होते.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार अनाथ, सोडून दिलेले व परित्यागीत बालकांचे दत्तक आदेश तसेच नात्यांतर्गत दत्तक व सावत्र दत्तक करण्याकरीता दत्तक नियमावली 2022 तयार करण्यात आली आहे. त्यानुसार सदर आदेश पारीत करण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यापूर्वी सदर दत्तक आदेश न्यायालयामार्फत केले जात होते. आता मात्र ही जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी करून इच्छुक पालकांकडे दत्तक बालके देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी आज पालकांना सुपूर्द केले. यावेळी दत्तक घेतलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. नेरुळ येथील चिल्ड्रन ऑफ द वर्ड इंडिया ट्रस्ट व डोंबिवली येथील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट दत्तक संस्थांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली.

यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव, सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी शिरसाट, नेरुळ येथील चिल्ड्रन ऑफ द वर्ड इंडिया ट्रस्ट दत्तक संस्थेच्या बेट्टी मथाई, डोंबिवलीतील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट वंदना पाटील आदी उपस्थित होते.

बालकल्याण समिती ठाणे यांच्या आदेशान्वये या दोन्ही संस्थांमध्ये अनाथ, सोडून दिलेले व परित्यागीत बालकांना दाखल करण्यात येते. CARA (Central Adoption Resource Authority) CARINGs cara.nic.in या संकेतस्थळावर दत्तक इच्छुक पालक नोंदणी करून ‘कारा’ ने दाखविलेले मुलगा किंवा मुलीला पालकांनी राखीव केल्यानंतर दत्तक समितीद्वारे पालकांची मुलाखत घेऊन दत्तक आदेश करीता जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यात येते.

जीवनातील एक वेगळा क्षण

अनाथ, सोडून दिलेले व परित्यागित बालकांना पालक मिळणे व याचा आनंद हा त्या बालकांच्या चेहऱ्यावर पाहणे क्षण आगळावेगळा आहे. हे मानवतेचे काम माझ्या सहीने होत आहे, हा माझ्या जीवनातील अनोखा क्षण असल्याची भावना जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी व्यक्त केली. दत्तक घेणाऱ्या पालकांनी शिनगारे यांनी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी दत्तक जाणारी बालकेही उपस्थित होती. त्यांच्या हसण्या-खेळण्याने जिल्हाधिकारी यांच्या दालनाला आज वेगळेच रुप आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!